छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात या कार्यक्रमाचा मोठा वाटा राहिला आहे. आता या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक, काही कलाकार व कार्यक्रमाचे परीक्षक लवकरच एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ‘गुलकंद’ असं या चित्रपटाचे नाव असून आगळ्यावेगळ्या आणि हटके शीर्षकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशातच आता या चित्रपटाचे आणखी एक नवीन मोशन पोस्टर आले आहे. (gulkand motion poster)
काही दिवसांपूर्वी ‘गुलकंद’ या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाद्वारे करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हीच उत्सुकता कायम ठेवत आजच्या मकर संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून मात्र प्रेक्षकवर्गात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांचे पतंग आकाशात उंच भरारी घेताना दिसत असतानाच काही गुंतागुंतही दिसत आहे.
तसंच या व्हिडीओमध्ये पुढे कधी समीर आणि सईची पतंग एकत्र दिसत आहे, तर कधी प्रसाद आणि सईची पतंग उडताना दिसत आहे. त्यानंतर मध्येच समीर आणि ईशाची पतंगही भरारी घेताना दिसत आहे. त्यामुळे कोणाची पतंग कुठे चालली आहे?, किंवा कोण कुणाची पतंग कापणार आहे? हे बघायला मजा येणार आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना १ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
आणखी वाचा – Video : अक्षया-हार्दिक पोहोचले देवदर्शनाला, स्वतःच्या खांद्यावरुन वाहिली पालखी, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर ‘गुलकंद’च्या टीमकडून सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते. हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा असणार आहे. हास्यजत्रेमध्ये परफॉर्म करणारे कलाकार असो किंवा कार्यक्रमाचे दर्दी हास्यरसिक, प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले आहे. त्यामुळे आता कलाकार आणि हास्यरसिक यांचा मिळून चित्रपट येत असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.