Gaurav More Wedding : ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना मंच मिळाला आणि त्यांना लोकप्रियता मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर महाराष्ट्राबाहेरही म्हणजेच परदेशातही या शोचे या शोमधील कलाकारांचे चाहते आहेत. या शोमुळे आणखी एक प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. सध्या गौरवने हास्यजत्रेतून एक्झिट जरी घेतली असली तरी त्याला या शोने लोकप्रियता मिळवून दिली हे विसरून चालणार नाही. यानंतर गौरवने अनेक मराठी चित्रपटांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मात्र आता गौरव त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने नवं घर घेतल्याची गुडन्यूज दिली. यानंतर आता अभिनेत्याने गुपचूप लग्न करत साऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियांका कारेकरसह लग्नगाठ बांधली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवेनं या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऋतुजा बागवेनं इन्स्टाग्रामवर गौरव आणि त्याची पत्नी प्रियांकासोबत फोटो शेअर केला आहे. ‘मिस्टर अँड मिसेस’ असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. गौरवच्या पवई येथील नव्या घराची पूजा होती यानिमित्त त्याने काही पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. दरम्यान, यावेळी ऋतुजा बागवे ही गौरवची जवळची मैत्रीण त्याच्या नव्या घरी गेली होती. यावेळी तिने गौरव आणि त्याच्या पत्नीसह फोटो काढला आणि तो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

“मिस्टर अँड मिसेस तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला आयुष्यभर प्रेम, आनंद आणि सुख लाभो हीच सदिच्छा. करु आणि बच्ची गॉड ब्लेस यु”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय गौरवनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मित्रांबरोबरच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या घराची झलक दिसत आहे.
आणखी वाचा – विशाल कोटियनचे UNKNOWN FACTS; दगडी चाळीतला मुलगा ते ‘बिग बॉस’चा MASTERMIND
गौरवच्या लग्नामुळे त्याचे चाहते खूप आनंदी झाले असून त्याला शुभेच्छा देत आहेत. गौरवने इन्स्टाग्राम स्टोरीवरही मित्रांसोबतचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये अभिनेत्याच्या घराची झलक दिसतेय. गौरव मोरेच्या दाराबाहेरच्या नेमप्लेटनं चाहत्यांचं लक्ष वेधलंय. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी गौरवची आकर्षक अशी नेमप्लेट आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो करत ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ ही मिळालेली ओळख तो कदापि विसरलेला नाही.





