यंदा दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीबरोबरच नवरा-बायकोच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे ‘पाडवा’. पाडव्यानिमित्त नवरा-बायको एकमेकांना भेटवस्तू देत पाडवा साजरा करतात. सामान्यांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी त्यांचा पाडवा उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक पाडवा हा नवरा-बायकोसाठी खास असतो. अशातच यंदाचा पाडवा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रतासाठीही खास आहे. (Actress Namrata Sambherao And Yogesh Sambherao Working Together In Movie)
नम्रता आणि तिचा नवरा योगेश संभेराव हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नम्रता योगेशबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर या जोडीला नेटकरी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देतात. अशातच सोशल मीडियावरील ही प्रसिद्ध जोडी आता एका चित्रपटातदेखील एकत्र पाहायला मिळणार आहे. नम्रताचा नवरा योगेश संभेराव तिच्यासह आगामी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे नम्रतासाठी यंदाचा पाडवा हा नक्कीच खास आहे.
येत्या ८ डिसेंबर रोजी नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तिच्याबरोबर तिचा नवरा योगेशही असणार आहे. या चित्रपटात योगेश एका लहानश्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटातील ही खास भूमिका त्याने नम्रताला यंदाच्या पाडव्याचं गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि यामुळे नम्रतादेखील नक्कीच आनंदी असणार, असं म्हणायला हरकत नाही. येत्या ८ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार अशी भली मोठी फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.