‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर सर्वांच्याच हृदयामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपला जीवनप्रवास माध्यमांसमोर व्यक्त केला. त्यातील एक आघाडीचा आणि लाडका अभिनेता म्हणजे श्याम राजपूत. श्याम राजपूत यांनी नुकतंच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर आले. खळखवून हसवणारा अभिनेता ते हळवा बाप नक्की कसा आहे याबद्दलची भावना समोर आली. (actor Shyam Rajput Emotional Moment)
कार्यक्रमाच्या सेटवर श्याम नेहमी नेहमीच हसत खेळत वावरत असतात. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ते त्यांच्या स्किटमध्ये आपला जीव ओततात. श्याम यांचा आपल्या कुटुंबावर खूप जीव आहे. त्यांना एक मुलगा असून त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ते खूप कौतुकाने आपल्या सहकाऱ्यांना सांगत असतात. अशातच मुलाखत सुरू असताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला की, “इतकी प्रसिद्धी मिळालेली असताना तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत जेव्हा वेळ घालवता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा आलेला हळवा क्षण कोणता?”, त्यावर ते म्हणाले की, “मी एकदा चित्रीकरण संपवून खूप दिवसांनी घरी गेलो होतो. कोरोना काळात हास्यजत्रेचे चित्रीकरण हे दमणमध्ये सुरू होते. त्यामुळे तब्बल ४० ते ४२ दिवसांनी मी माझ्या घरी म्हणजे छत्रपती संभाजी नगरला गेलो होतो, जेव्हा मी माझ्या घरात पाऊल ठेवले तेव्हा झटकन माझा मुलगा मला येऊन बिलगला. तेव्हा तो जवळपास सात ते आठ मिनिटे काही न बोलता फक्त बिलगून होता. तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. त्याचवेळी माझी बायको,माझे आई-बाबा , माझा भाऊ यांच्याकडे मी जेव्हा पाहतो तो क्षणही माझ्यासाठी खूप खास असतो”, असेही त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी मुलाबद्दलचा अजून एक प्रसंग सांगितला,ते म्हणाले की, “मी हास्यजत्रेमधून प्रसिद्ध झाल्यामुळे शाळेमध्ये त्याच्या मित्रांबरोबर फोटो काढावा म्हणून घेऊन जातो. सर्वांबरोबर फोटोही काढण्यास सांगतो”, असे सांगितले.
यानंतर “मुलाने कधी कामाची पोचपावती दिली आहे का ?” असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सांगितले की, “एकदा शिवाली परबबरोबर माझे एक स्किट सुरू होते ज्यामध्ये तिने लहान मुलीची भूमिका केली होती. वनिता खरातही त्यामध्ये होती. शिवाली माझ्याबरोबर खूप मस्ती करत होती, त्रास देत होती तेव्हा तो खूप खळखळून हसला होता. माझ्या मुलाचे खळखळून हसणे हीच माझ्यासाठी खरी पोचपावती आहे”, असे अगदी भावनात्मक होऊन त्यांनी सांगितले. श्याम त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या सर्व प्रसंगांवर अगदी भरभरून बोलले आणि अगदी दिलखुलास गप्पाही मारल्या.