पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी आपला जीव गमावला. काही कुटुंबातील तर कर्ते पुरुषच आपल्या जवळच्या मंडळींना कायमचे सोडून गेले. ही भयावह घटना आयुष्यभर कुटुंबियांच्या मनात घर करुन राहणार आहे. हल्ल्यादरम्यान पहलगाममध्ये संपूर्ण घटना पर्यटकांनी डोळ्यांदेखत पाहिली. तेव्हा तेथील परिस्थिती अत्यंत भयावह होती. यामध्ये डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी व अतुल मोने यांनी आपला जीव गमावला. दरम्यान अतुल मोने यांची पत्नी व मुलगी ऋचा मोने यांनी पहलगाममधील सत्य परिस्थिती काय होती? याविषयी सांगितलं. डोळ्यांसमोर एका मुलीने तिच्या वडिलांना तर पत्नीने तिच्या पतीला गमावलं. (Maharashtra tourist killed in pahalgam terror attack)
अतुल मोने मध्य रेल्वेमध्ये अभियांत्रिक पदावर कार्यरत होते. आता सरकारद्वारे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अतुल यांच्या पत्नीला मध्य रेल्वेमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. दरम्यान एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना ऋचाने संपूर्ण हल्ल्याबाबत सांगितलं. तसेच वडिलांना आणि दोन्ही काकांना तिने रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. दोन दहशतवाद्यांना तिने गोळीबार करताना पाहिलं. हा काळा दिवस कधीही न विसरणारा आहे.
हिंदू कोण मुस्लिम कोण? विचारताच…
ऋचा म्हणाली, “आम्ही मिनी स्वित्झर्लँडमध्ये होते. तिथे सगळं सुरळीत सुरु होतं. तिथे लोक एन्जॉय करत होते. फोटो वगैरे काढत होते. आम्ही तिथून निघणारच होतो आणि गोळीबार सुरु झाला. काय सुरु आहे हे कळायलाच मार्ग नव्हता. सगळे एकाच दिशेने पळत होते. खाली झुकत होते. मीही तसंच केलं. फायरिंग सुरुच होती. मी तरी दोन जणांना फायरिंग करताना पाहिलं. आम्ही एका ठिकाणी एकत्र होते. तिथे ते लोक आले. त्यांनी विचारलं की, हिंदू कोण आहे?, मुस्लिम कोण आहे?. तिथे माझ्या संजय काकांनी (संजय लेले) थोडा हात वरती केला. तर त्यांना डोक्यात समोरच गोळी मारली. त्यांच्या मागेच मी उभी होती. हे सगळं मी पाहिलं”.
…अन् बाबाच्या पोटात गोळी मारली
“तेव्हा हेमंत काका (हेमंत जोशी) त्यांना विचारायला गेला की, नक्की काय झालं आहे?. तर त्यांच्यावरही गोळी झाडली. तेव्हा बाबा बोलले की, गोळी नका मारु आम्ही काही करत नाही आहोत. तिथे माझी आई होती. मीही घाबरली होती. त्यामुळे बाबाबरोबर उभी होते. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेली. पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळी मारली. मी ते पाहून खाली झोपले. भाऊ व काकू जवळ गेले. पण आई तिथेच होती. मी जिथे गेले तिथे संजय काकांचं डोकं रक्ताने भरलं होतं. माझ्या डोळ्यासमोर मी रक्त वाहताना बघत होते”.
नवऱ्याला कव्हर करायला गेले तेव्हा…
अतुल मोनेंच्या पत्नी म्हणाल्या, “नवऱ्याला वाचवण्यासाठी मी पुढे गेले. त्यांना कव्हर करत होते. तर त्यांनी बरोबर नवऱ्यालाच गोळी मारली. आप लोगों ने आतंक मचा के रखा है असं ते गोळी मारणारे म्हणाले. अतुलला गोळी लागलेली मी पाहिलं. त्याच्या पोटाला गोळी लागलेली. त्याला छातीला वगैरे गोळी लागलेली नव्हती. हिंदू व मुस्लिम वेगवेगळे व्हा असं आधी बोलले. पण त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. आम्ही खालीच वाकून राहिलो. सगळ्या माणसांनाच मारलं. घरातल्या कर्त्यांनाच मारलं”. अतुल मोने यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कितीही पैसे, नोकरी दिली तरी ऋचाला तिचे वडील व पत्नीला तिचा नवरा परत मिळणार आहे का? हाही प्रश्न अनुउत्तरितच राहतो.