इंजिनिअर ते अभिनेता म्हणून सिनेविश्वात पदार्पण करणारे आणि सर्वत्र गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतून शकुनी मामाची भूमिका साकारणारे आपले सगळ्यांचे लाडके अभिनेते गुफी पेंटल यांच्या आरोग्याविषयी नुकतीच एक बातमी समोर आली आहे.
गुफी पेंटल यांची प्रकृती अचानक बिघडली असून उपचारादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेल्या शकुनी मामा या भूमिकेमुळे गुफी पेंटल घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.(Gufi Paintal Health update)
वाचा गुफी पेंटल यांच्या प्रकृतीबाबत अपडेट (Gufi Paintal Health update)
गुफी पेंटल यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अभिनेत्री टीना घईने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ‘गुफी पेंटल यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांची तब्येत बरी नाही’, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत गुफी पेंटल यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान या संदर्भात टीना यांनी माध्यमांसोबतही संवाद साधला, यावेळी त्यांनी सांगितलं की गुफी यांच्या कुटुंबीयांनी अधिक माहिती जाहीर करण्यास नकार दिला आहे.(Gufi Paintal Health update)
हे देखील वाचा – ‘नसिरुद्दीन यांची नियत चांगली नाही..’ म्हणत भाजप नेते मनोज तिवारी यांनी साधला निशाणा
बी.आर चोपडा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने एक काळ चांगलंच गाजवला होता. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेतील भूमिकांसाठी अनेक कलाकारांचे ऑडिशन्स त्यावेळी घेण्यात आले होते. विशेष म्हणजे शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल हेच मालिकेचे कास्टिंग डायरेक्टरसुद्धा होते. मालिकेतील इतर कलाकारांची निवड ही गुफी पेंटल यांनीच केली होती. श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपटही गुफी पेंटल यांनी दिग्दर्शित केला होता.