‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विनोदी अभिनेता अशी लोकप्रियता असलेला कुशल नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानंतर आता कुशल ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ही कुशल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः आशयघन असे कॅप्शन देत तो वेळोवेळी त्याच्या आयुष्यातील अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. (Kushal Badrike Mother Video)
अशातच कुशलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘मदर्स डे’निमित्तच्या एका व्हिडीओने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कुशल नव्हेतर त्याची आई कुशलच कौतुक आणि तक्रार करताना दिसत आहे. कुशलच्या बालपणीच्या आठवणींना त्याच्या आईने उजाळा दिलेला पाहायला मिळतोय. दरम्यान हा ‘मॅडनेस मचायेंगे’च्या मंचावर व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या आईने कुशलशी संपर्क साधला असताना त्याच्या आईने कुशलचं भरभरुन कौतुक व तक्रार केलेली पाहायला मिळत आहे. यावेळी आईचं बोलणं शांतपणे ऐकणारा कुशल थोडासा भावुक झालेला पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना कुशलची आई म्हणाली, “कुशलच्या बालपणीच्या खूप आठवणी आहेत. लहानपणी तो खूप मस्तीखोर होता. मस्ती केल्यानंतर त्याचा मोठा भाऊ त्याला मारायचा. तेव्हा तो येऊन त्याच्या वडिलांकडे मोठ्या भावाची तक्रार करायचा. वडील सांगायचे, मोठ्या भावावर कधीच हात उचलायचा नाही. तेव्हा तो जाऊन छोट्या बहिणीला मारायचा. तेव्हा ती कुशलची तक्रार घेऊन माझ्याकडे यायची. कुशलला जेव्हा विचारायचे की, तू हिला का मारतोस?, त्यावर त्याच उत्तरं हे असायचं की, मोठ्या हवेवर हात उचलायचा नाही असं सांगितलं होतं म्हणून मी छोट्या बहिणीला मारलं. कुशलने खूप परिश्रम घेत तो इतका मोठा अभिनेता झाला आहे. ज्यावेळी मी बाजारात जाते तेव्हा मुलं म्हणतात ही कुशलची आई आहे, आणि त्यावेळी मला कुशलचा खूप अभिमान वाटतो. तुझं जगभरात नाव व्हावं हिच माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत.
“आपलं वय कितीही वाढलं तरी आईच्या डोळ्यात आपलं बालपण कायम तरंगताना दिसतं.mother’s Day च्या निमित्ताने आमच्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात, आम्हाला सरप्राइज दिलं गेलं. त्यातला माझ्या आईचा हा व्हिडीओ. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन देत कुशलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.