मराठीसह हिंदी, बंगाली, भोजपुरी अशा अनेक भाषांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे व कायमच आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारे बहुआयामी अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी. मराठीसह हिंदी मालिका व चित्रपटांत अभिनय करत मिलिंद गुणाजी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शोमधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती.
मॉडेलिंग आणि अभिनयाबरोबरच त्यांनी गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालनही केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या तसेच पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले. मिलिंद गुणाजींसह त्यांची पत्नी राणी गुणाजी यादेखील एक अभिनेत्री आहेत. उत्तम अभिनेते व अभिनेत्री असलेल्या मिलिंद व राणी यांच्या मुलाने अभिनय हे क्षेत्र न निवडता त्याने दिग्दर्शनात आपली वेगळी वाट निवडली आहे.
मिलिंद व राणी यांच्या मुलाचे नाव अभिषेक असं असून आगामी काळात त्याने दिग्दर्शित केलेला ‘रावण कॉलिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबद्दल मिलिंद गुणाजी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या खास कार्यक्रमात सांगितले. मिलिंद यांचा मुलगा अभिषेक हा एक आयटी इंजिनिअर आहे. मात्र त्याने मनोरंजन क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘चाल’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले होते. या शॉर्ट फिल्ममध्ये सुमीत राघवन व मिलिंद गुणाजी महत्त्वाच्या भूमिकेत होते.
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?
तसेच अभिषेकने काही जाहिरातींसाठीही काम केले आहे. त्याचबरोबर त्याने काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून अभिषेक गुणाजीचा रावण कॉलिंग हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.