देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. यंदाच्या या निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कंगना राणौत, हेमा मालिनी व अरुण गोविल यांचा समावेश आहे. त्यामुळे या कलाकार मंडळींच्या निकालाबाबत सऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक कलाकार रिंगणात उतरले होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मंडी मतदारसंघातून आणि अरुण गोविल यांनी मेरठसारख्या जागांवरून निवडणूक लढवली आहे. तर अभिनेत्री हेमा मालिनी आणि अनेक भोजपुरी कलाकारांनी मथुरा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे लवकरच उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे.
मंडी मतदार संघातून अभिनेत्री कंगणा रनौत ४२८५१ मतांनी आघाडीवर आहे. तर गोरख मतदार संघातून अभिनेते रवी किशन हे २१०४२ मतांनी आघाडीवर आहेत. याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून १३४६४४ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच ‘रामायण’ फेम अरुण गोविल हे मथुरा मतदारसंघातून १५९१४ मतांनी आघाडीवर आहेत.
भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव बिहारच्या करकट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आहेत. आझमगढमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणारे दिनेश लाल यादव हे सपाचे धर्मेंद्र यादव यांच्यापेक्षा मागे आहेत. ते ३८८९३ मतांनी पिछाडीवर आहेत. तसेच करकट मतदारसंघातून पवन सिंह ४१८२५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या जागेवर राजाराम सिंह हे १६००३ मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, १९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान झाले होते. सध्या आतापर्यंतच्या वृत्तानुसार, एनडीए आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांनंतर चित्र स्पष्ट होणार असून, कोण या लढतीत विजय मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे.