मराठी मनोरंजन सृष्टी आपल्या दमदार अभिनयशैलीने बहारदार बनवणारं एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. ‘हमाल दे धमाल’,’अशी ही बनवाबनवी’,’एकापेक्षा एक’,’झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही लक्ष्मीकांत यांनी चांगला लौकिक मिळवला.(Purshottam Berde Talked About Laxmikant Death)
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर नेहमी सावलीसारखे असणारे त्यांचे चुलत बंधू आणि लेक्षक, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी नुकतंच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या निधनाबद्दल खुलासा केला आहे. ‘सिनेमागली’ या यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या पुरुषोत्तम यांनी सांगितलं “त्याचं नसणं म्हणजे माझा खूप मोठा तोटा आहे. आम्ही कधी मनसोक्त गप्पा मारल्या नाहीत. आम्हा दोघांमध्ये जो संवाद व्हायचा तो अत्यंत शांतपणे व्हायचा. आम्हा दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तरी मला त्याच्या मनात काय चाललंय हे कळायचं”.

पुढे पुरुषोत्तम यांना “जर लक्ष्मीकांत बेर्डे यांना तुमच्या मनातील एखादी खंत सांगायची झाली तर काय सांगाल” असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर पुरुषोत्तम म्हणाले “लक्ष्मीकांतने खूप हळूहळू स्वतःला संपवलं. त्याने लहानपणापासूनच कोणाचं ऐकलं नाही. त्याच्या मनात जे यायचं तो ते बेधडकपणे करायचा कामाच्या बाबतीतही तो खूप शिस्तप्रिय होता. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत तरीही मी त्याला काही गोष्टी करु नकोस हे सांगू शकलो नाही याची खंत मला आजही आहे. सुपरस्टार झाल्यानंतर त्याचं आयुष्य ज्याप्रकारे बदललं त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला आध्यात्माची गरज होती आणि हे त्याला कसं सांगावं याच विचारात मी राहिलो. लक्ष्मीकांतने त्याच्या बायकोचं जरी ऐकलं असतं तरीही त्याचं आयुष्य आज वेगळं असतं”.(Purshottam Berde Talked About Laxmikant Death)
पुरुषोत्तम बेर्डे यांनी या मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ मराठीत नाही तर बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम करत नाव कमावलं. ‘हम आपके है कोण’,’मैने प्यार किया’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे झळकले आहेत.