Navra Maza Navsacha 2 : मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. (Dhruva Datar on Navra Maza Navsacha 2)
महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार हा चित्रपट तुफान चालत असल्याचे वाटत असलं तरी काही प्रेक्षकांनी त्यांना हा चित्रपट आवडला नसल्याचे म्हटलं आहे.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मध्ये मोठा ट्विस्ट, भुवनेश्वरीची घरात एन्ट्री, अधिपतीने धरले पाय
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठी अभिनेत्यानेही त्याला हा चित्रपट आवडला नसल्याचे म्हटलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे ध्रुव दातार. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत राहुल चांदेकर ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर “खूप वाईट चित्रपट” असं म्हटलं आहे. याशिवाय त्याने आणखी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबद्दल ‘खूप वाईट चित्रपट आहे’ अशी जी स्टोरी टाकली. त्यावर मला लोकांच्या खूप कमेंट्स येत आहेत. मला खूप लोकांचे मॅसेज येत आहेत की तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोलायला पाहिजे. अरे पण मी असं का नाही बोलायला पाहिजे?”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मी माझं मत मांडत आहे की, मला हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि जे चांगलं आहे त्याचं मी कौतुकच करत आहे. तो चित्रपट तितका छान असता तर त्याचे मी कौतुक केलंच असतं. पण तो चित्रपट खरच खूप वाईट आहे आणि मी मराठी कलाकार आहे म्हणून मी उगाच कौतुक करु का? माफ करा पण मी असं नाही करु शकत”. ‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे.