रंगभूमी असो किंवा सिनेमा, आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सर्वांचे लाडके ‘पट्या दादा’ अर्थात अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गिरगावच्या राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्या गिरगावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या गिरगावशी संबंधित त्यांच्या लाखो आठवणी आहेत. गिरगावकरांसाठी ०९ ऑगस्टचा दिवस अत्यंत दु:खद होता. महाराष्ट्रातील प्रथा-परंपरा ज्याठिकाणी तरुणाईही आवडीने जपते असं मुंबईतील ठिकाण म्हणजे गिरगाव. अशातच आज सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असून गिरगावातही दहीहंडीचा मोठा उत्साह असतो. गिरगावातील चाळी अजूनही या सणासुदीच्या काळातील उत्साहाच्या साक्षीदार आहेत. (Pradeep Patwardhan Dahihandi Dance)
प्रत्येकवर्षी दहीहंडीच्या सणाला दिवंगत अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असतो, ज्यात ते बेभान होऊन नाचताना दिसतात. दहीहंडीच्या वेळी या अभिनेत्याला डान्स करण्यासाठी खास बोलावलं जायचं. सलमान-शाहरुख यांना पाहण्यासाठी जेवढी गर्दी होते. त्याहून जास्त गर्दी प्रदीप यांचा डान्स पाहण्यासाठी व्हायची असं विजय पाटकर एका कार्यक्रमात म्हणाले होते. अशातच अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील आजच्या दहीहंडीच्या सणानिमित्त प्रदीप पटवर्धनांचा तो जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच कलाकारांचा संताप, रितेश देशमुख म्हणाला, “राजे आम्हाला…”
अभिजीतने प्रदीप पटवर्धन यांचा तोचं जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “पट्या दादा, चिकण्या, तुझी खूप आठवण येत आहे यार” असं म्हणत अभिजीतने त्यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. प्रदीप पटवर्धन यांचा व्हिडीओ दहिहंडीच्या दिवशी नाचतानाचा असून या व्हीडिओत प्रदीपजी दहीहंडीच्या गाण्यावर बेभान होऊन नाचतानाचे पाहायला मिळत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबिय आणि शेजारीही दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या मुंबईतील गिरगावमधील घरातील आहे.
आणखी वाचा – “पोस्ट करणं बंद करा”, बदलापूर व कोलकाता बलात्कार प्रकरणी प्रिया बापटची पोस्ट, म्हणाली, “आता कदाचित…”
दरम्यान, मराठी रंगभूमी, चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये प्रदीप यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेनेदेखील प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं. एवढंच नाही तर त्यांनी अनेक चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे, एक पोकळी निर्माण झाली.