Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. पण २६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला. या घटनेनंतर सोशल मीडियावर बरेच पडसाद उमटू लागले. या प्रकरणावर मराठी मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अनेक कलाकार मंडळींनी याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed)
अभिनेते किरण माने, रितेश देशमुख, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, लेखक अरविंद जगताप व गायक मंगेश बोरवणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल. महाराजांचा पुतळा नाही. प्रायश्चित वगैरे मानत असाल तर जगातलं सगळ्यात मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हावं आणि पन्नास किलोमीटरपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकारण्याचं चुकूनही नाव नसावं”
तर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनेही लांबलचक पोस्ट शेअर करत त्याची प्रातिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, दर्शनाला आलात? या.. पण या चौथ-यावर, सध्या राजे नाही. चौथरा आहे, उद्घाटनाचा शिलालेख आहे. त्यांचही दर्शन घ्यायला, हरकत नाही. टाळा त्या बातम्या आणि असे इकडे या.. पाहीलात तो रिकामा चौथरा? नाही.. तसं नाही.. एकदा होते ते तिथे, लोकसभेआधी आठवायचे, लोकसभेनंतर हरवायचे, इतिहासाचे पान बंद करून, बरोबर जयंतीला पुन्हा स्मरायचे. सारं काही ठीक चालले होते. मतांच्या राशी, मिरवणूकांचे निमित्त, झडत होते चौकापाशी.. दख्खन किना-यांवर, ढोलपथक गाजत होते, शिवजागर गर्जत होते, लोकसभा, विधानपरिषदा स्मरण समोर दुमडत होते, मतपेट्यांचे हिशेब हरणाच्या गतीने बागडत होते, सारे काही घडत होते हवे तसे..
यापुढे तो म्हणाला, “पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव मालवण किनारपट्टीवर अडवलेला कोणी एक भणंग मावळा तारस्वरात ओरडला ‘राजंऽऽ खाली या’ आणि विधानसभेआधी, आम्ही पाहतो तो चौथरा रिकामा. पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे; परत? कदाचित येतीलही ‘ते’.. पण गडकिल्ल्यावर, ते पुन्हा रहायला गेले असतील तर.. त्यांना आठवायचं की नाही, याचा विचार करावा लागेल.. आमच्या नेत्यांना, मुंबईला पत्रव्यवहार चालू आहे. दुस-या पुतळ्यासाठी. पण तूर्त चौथ-याचे दर्शन घ्या, तसं म्हटले तर चौथ-याचे महत्व अंतिम असतं, चौथरा सलामत तो पुतळे पचास”

तर गायक मंगेश बोरगांवकरनेही पोस्ट शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे वृत्त शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “नवीन संसद गळतेय, राम मंदीर गळतंय, उभारलेले पपुतळे पडतात, पूल कोसळतात, रस्ते तर आजन्म खड्डेयुक्त आणि आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळतो. महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रातील अशी वाताहात कधी झाली नसेल. परत तेच आपण नागरीक टॅक्स भरत हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं”. याचबरोबर रितेश देशमुखनेही “राजे माफ करा” म्हणत याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
राजे माफ करा 🙏🏽#छत्रपति_शिवाजी_महाराज
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 26, 2024
अमोल कोल्हे यांनीही याबद्दल पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे”.
आणखी वाचा – “पोस्ट करणं बंद करा”, बदलापूर व कोलकाता बलात्कार प्रकरणी प्रिया बापटची पोस्ट, म्हणाली, “आता कदाचित…”
दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, असं पत्र पालकमंत्र्यांकडून दाखवण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे राजकीय वर्तुळातलं वातावरण चांगलच पेटलं आहे. त्याचप्रमाणे आता आरोप प्रत्यारोपांचं सत्रही सुरु झालंय. असं असलं तरी या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे चित्र सध्या आहे.