छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचं निधन होऊन नऊ वर्ष झाली आहेत. प्रत्युषानं २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मैत्रिणीने यासाठी प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार ठरवलं होतं. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर राहुल राज सिंगनं धक्कादायक खुलासे केले आहेत आणि अभिनेत्री काम्या पंजाबीवरही गंभीर आरोप केले आहेत. त्याला एका खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते आणि काम्याने तिच्या काही मित्रांबरोबर मिळून जी गोष्ट जगासमोर मांडली होती ते सगळं तिने लक्ष वेधून घेण्यासाठी केलं होतं. त्याने काम्याला फेक व्यक्ती म्हटले आणि ती प्रत्युषाची मैत्रीण नसल्याचेही सांगितले. (rahul raj allegations on kamya punjabi)
राहुलने ‘बॉलीवूड शादी डॉट कॉम’शी संवाद साधताना सांगितले की, “त्या ४० वर्षीय महिलेने २१ वर्षांच्या प्रत्युषाचा फायदा घेतला. जर मी ६० वर्षांच्या व्यक्तीबरोबर मजामस्ती केली आणि ते माझे मित्र आहेत असे म्हटले तर ते विचित्र वाटते ना?. काम्या ही प्रत्युषापेक्षा वयाने मोठी होती. त्यांच्यातील वयाचा फरक पाहा. मग ती मैत्रीण कशी असेल?, ती मोठ्या बहिणीसारखी झाली ना? प्रत्युषा २१ वर्षांची आहे आणि काम्या ४० वर्षांची आहे. तिने प्रत्युषाला दारु पिऊ नको असे सांगायला हवे होते. मात्र याबद्दल तिने कधीच तिला असं सांगितलं नाही, कारण प्रत्युषा तिच्यासाठी एक पैशाचा स्रोत होती. प्रत्युषा खर्च उचलणार, बिल भरणार म्हणून ती तिची मैत्रीण होती”.

आणखी वाचा – सई, प्रसाद, समीर, ईशा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, ‘गुलकंद’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जुगलबंदी होणार
यापुढे राजुल राजने प्रत्युषाशी मैत्री करण्यामागे काम्याचा नेहमीच स्वार्थी हेतू असल्याचेही म्हटले. पहाटे २-३ च्या सुमारास ती प्रत्युषाबरोबर हिंडत असे. काम्याने तरुण वयातच प्रत्युषाला दारु प्यायला प्रोत्साहन दिले आणि तिचं करिअर उद्ध्वस्त केल्याचे राहुलने पाहिले होते. जर काम्या प्रत्युषाला तिची मैत्रीण म्हणत होती तर तिने प्रत्युषाबरोबर मद्यपान करुन, रात्री उशिरापर्यंत फिरुन तिचे नशीब व करिअर उद्ध्वस्त करु नये असं राहुलला वाटत होते हेही सांगितले. काही दिवसांपूर्वी त्याने प्रत्युषाला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा जिवंत असल्याचा दावाही राहुल राजने केला होता.
प्रत्युषाचा मृत्यू हॉस्पिटलच्या औपचारिकतेला उशीर झाल्यामुळे झाल्याचा आरोप राहुलने केला आहे. याबद्दल राहुल राज सिंह म्हणाला, “औपचारिकता आणि प्रक्रिया इतकी लांब होती की, प्रत्युषाला प्रवेश मिळण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला आणि या सगळ्यात तिचा मृत्यू झाला”. दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी राहुल राज सिंहविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राहुलला तुरुंगातही जावे लागले होते.