आपल्या शारीरिक आणि अभिनयाच्या उंचीच्या जोरावर कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टरमधील पोलिस अधिकार्याची भूमिका चपखलपणे सादर करणार्या आणि त्याच ताकदीने नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये लाल्यासारख्या अन्य भूमिकाही अजरामर करणारे प्रख्यात अभिनेते म्हणजे रमेश भाटकर. ३ ऑगस्ट १९४९ रोजी जन्म झालेल्या रमेश भाटकर यांनी गेली तीन-साडेतीन दशके अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. केवळ चित्रपटच नव्हे, तर मालिका व नाटकांमध्येही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘कमांडर’ अशा टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. वयाची सत्तरी गाठली तरी त्यांच्यावर वार्धक्याचा परिणाम दिसत नव्हता. (Mridula Bhatkar on Ramesh Bhatkar)
रमेश भाटकरांनी मृदुला यांच्याबरोबर लग्न केले होते आणि या त्यांच्या या ४० वर्षांच्या सुखी संसाराबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. मृदुला यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. ज्यात त्यांनी रमेश भाटकरांच्या सहजीवनाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्या असं म्हणाल्या की, “माझं आणि रमेशचं तीन वर्षे आधी अफेअर होतं. कॉलेजमध्ये असताना माझे बाबा गेले त्यानंतर आम्ही २४ डिसेंबर २०१८ ला आम्ही आमच्या लग्नाचे एकूण ४० वर्षे पूर्ण केली. आम्ही दोघेही एकत्र वाढलो. मी जर्नलिझमचे शिक्षण घेतल्यानंतर पुढचं लॉचे शिक्षण घेण्यासाठी मला रमेशने मदत केली त्याने स्वत: खूप काम केलं”.
यापुढे त्या म्हणाल्या की, “मी माझ्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. असा विरोध नव्हता. पण त्यांचं असं होतं की, माझ्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी हवं होतं. या सगळ्यातून आमचा अतिशय सुंदर संसार झाला. तेव्हा रमेशकडे फक्त १६ रुपये बँक बॅलन्स होता. त्यानंतर ४० वर्षांचा संसार १६ आणेचा झाला. संसार करताना आणि प्रेम करताना पैसा हा महत्त्वाचा नसतो. प्रेम असेल तर संसार हा होतोच”.
दरम्यान, रमेश भाटकरांच्या निर्भीड, निडर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका पाहून एकेकाळी अनेकांना पोलिस दलात भरती होण्याची स्फूर्ती मिळायची. ४ फेब्रुवारी २०१९ ला रमेश भाटकर यांचे निधन झाले. त्यांचे निधन चाहत्याच्या मनाला चटका लावणारे असून, आठवणींच्या रूपात ते कायम प्रत्येकाच्या हृदयात राहतील.