‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील गुरुचरण सिंग काही दिवसांपासून चर्चेत आहे. २५ दिवस बेपत्ता राहून अखेर अभिनेता घरी परतला आहे. गुरुचरण सिंग बेपत्ता होता तेव्हा त्याच्या वडिलांना प्रचंड काळजी वाटत होती. आता लेक परतल्यानंतर त्यांच्या वडिलांना खूप आनंद झाला. नवा जन्म मिळाल्याचा भास त्यांना झाला. अभिनेता २२ एप्रिलपासून बेपत्ता होता आणि १८ मे रोजी घरी परतला. गुरुचरण सिंग यांचे वडील खूप आनंदी आहेत, पण त्यांना आता त्यांच्या मुलाची काळजी सतावत आहे. वडिलांनी असेही सांगितले की, गुरुचरण हा मोबाईल फोन वापरत नाही आहे आणि त्याचा नंबरदेखील बंद आहे. (Gurucharan Singh Health Update)
गुरुचरण सिंग यांचे वडील हरगीत सिंग यांनी एका मुलाखतीत त्यांचा मुलगा गुरुचरण सिंगबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. गुरुचरण सध्या आजारी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हरगीत सिंह यांनी ‘दैनिक भास्कर’ला सांगितले की, गुरुचरण सिंग जेव्हापासून घरी परतला आहे, तेव्हापासून त्यांची प्रकृती सुधारु लागली आहे.
हरगीत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी गुरुचरण सिंग घरी परतले, तेव्हा ते खूपच अशक्त दिसत होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे हरगीत सिंग चिंतेत आले आहेत. गुरुचरण सिंग परत आल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले की ते आध्यात्मिक प्रवासाला गेले होते. मात्र वडील हरगीत सिंग यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. ते म्हणाले की, ते त्यांच्या मुलाशी फारसे बोलत नाहीत. तो त्याच्या आईशी जास्त बोलतो. कदाचित त्याने आपल्या आईला याबद्दल काहीतरी सांगितले असेल. पण हरगीत सिंग यांनी स्पष्टपणे सांगितले की, गुरुचरण यांनी त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल काहीही सांगितले नाही.
गुरुचरण सिंह यांनी २०२० मध्ये त्यांच्या आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला रामराम केला. आणि पालममधील त्यांच्या घरी परत आला. हरगीत सिंग यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की, गुरुचरण त्यांच्याजवळ मोबाईल ठेवत नाही आहेत. काही दिवसांपासून त्याने आपला नंबरही बंद ठेवला आहे. अशी माहिती आहे की, २२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंग मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता, परंतु त्याने फ्लाईट न घेता तो दुरीकडे निघून गेला. कुटुंबीयांनी अभिनेत्याचा शोध सुरु ठेवला आणि त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. हे अपहरणाचे प्रकरण असल्याचे गृहीत धरुन पोलिसांनी तपास सुरु केला. यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले.