मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय व प्रसिद्ध नावांपैकी एक नाव म्हणजे केदार शिंदे. आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून केदार शिंदे यांनी प्रेक्षकांना नेहमीच भारावून टाकले आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन, निर्मिती व अभिनय अशा तीनही क्षेत्रांतून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आजवर त्यांनी विविध कलाकृती सादर करत मराठी मनोरंजन विश्वात अमूल्य योगदान दिले आहे. या काळात त्यांनी अनेक चढ-उतार व संघर्ष पाहिला आहे. पण त्यांना मिळालेल्या यशात त्यांच्या पत्नीचाही तितकाच मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. (Kedar Shinde On Instagram)
केदार शिंदे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ त्याचबरोबर आपल्या कामाची माहितीही देत असतात. अशातच केदार शिंदे यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसासानिमित्त केदार यांनी एक खास पोस्ट करत पत्नीचे कौतुक केले आहे. केदार शिंदे यांनी पत्नीबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट केला असून या फोटोखाली लिहिलेल्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये असं म्हटले आहे की, “हा फोटो एकदम उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी काहीतरी करू शकलो. तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा आहे. तू माझ्या चांगल्या वाईट दिवसांत, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्यातील कला, माझ्या आयुष्यातले चढ-उतार हे तू जास्तच भोगले आहेस. आज ५१ वर्षे होत आहेत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस, करते आहेस आणि या पुढे ही करत राहशीलच याची मला खात्री आहे. तुला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.”
दरम्यान, गेले वर्ष हे केदार शिंदे यांच्यासाठी खास होतं. २०२३ मध्ये केदार यांनी ‘’महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केदार यांच्या या दोन्ही चित्रपटांनी २०२३ मध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट तर चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. त्यामुळे आता नवीन वर्षात केदार प्रेक्षकांच्या भेटीला काय घेऊन येणार आहेत?, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.