मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यामागे अनेक चित्रपट व कलाकारांचं मोलाचं योगदान आहे. मराठी चित्रपटाच्या यशात काही चित्रपटांची नाव नेहमी अग्रेसर असतात ती म्हणजे आधी ‘सैराट’,’वेड’ आणि सध्या चांगलाच चर्चेत असलेला ‘बाईपण भारी देवा’. बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने यशाची परिसीमा गाठली. आशावादी स्त्रिया आणि त्यांची स्वतःला ओळखण्याची जिद्द या गोष्टीवर आधारित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.(baipan bhari deva box office collection)
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या पासून म्हणजेच मागील २४ दिवसात तब्बल ६५ कोटी ६१ लाख रुपयांची कमाई केली आहे. या संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट केली आहे.
चित्रपटाचं यश आणि दिग्दर्शकाची खास पोस्ट (kedar shinde)
या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी लिहिलं आहे “ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा..”
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटानंतर सर्वात जास्त पसंती मिळालेला चित्रपट म्हणून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने मान पटकवला आहे. केदार शिंदे यांनी ही स्वामींची कृपा, सिद्धिविनायकाचा महाप्रसाद आहे आणि या चित्रपटाची नोंद इतिहास घेईल असं म्हणत चित्रपटाच्या यशाचं श्रेय स्वामींच्या चरणी वाहिलं. पुढे ते म्हणाले स्त्री घर चालवते तर सिनेमा निश्चितच चालवू शकते. बाईपण हा महाराष्ट्राचा महासिनेमा असं म्हणत त्यांनी चित्रपटाचं कौतूक देखील केलं .
हे देखील वाचा – ‘हैराण केलंय बायकांनी’…राजस्थान मध्ये १५० बायकांनी भांडण करत केली ‘बाईपणच्या’ शोची मागणी
चित्रपटाच्या या यशानिमित्त केदार शिंदे यांच्या सोबतच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी देखील खास पोस्ट करत चित्रपटाचं कौतुक केलंय. रोहिणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करत लिहिलंय “आता थांबायचं नाय…. म्हणत अवघ्या २४ दिवसात ‘बाईपण भारी देवा’ची उत्तुंग भरारी !”.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतंय. मराठी चित्रपट इतिहासात अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ मोडणार असं दिसतंय.