आपल्या आवाजाने कायमच चर्चेत राहणारी गायिका कार्तिकी गायकवाड नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली आणि हे कारण म्हणजे गायिका लवकरच आई होणार आहे. नुकतीच कार्तिकीने तिच्या सोशल मीडियावर ओटीभरणाचे काही खास फोटो शेअर केले. कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर आता कार्तिकीच्या घरामध्ये नवा पाहुणा येणार असल्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
कार्तिकी गायकवाड ही लवकरच आई होणार असून नुकताच तिच्या डोहाळ जेवणाचा जंगी कार्यक्रम पार पडला. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत. आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने तिने हा खास कार्यक्रम पार पाडला. “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य : समर्था खेसे युट्यूब वाहिनी)
अशातच ‘समर्था खेसे’ या युट्यूब वाहिनीवर कार्तिकीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने आई होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये कार्तिकीच्या अलिशान घराची खास झलक पाहायला मिळत आहे. कार्तिकीचे घर अगदी भव्यदिव्य असून तिचे घर पूर्णपणे पुरस्कार व बक्षिसांनी सजलेले पहायला मिळत आहे. तर कार्तिकीच्या घराच्या हॉलमधील एका भिंतीवर बक्षिस व पुरस्कार दिसत आहेत, तर एका भिंतीवर कार्तिकीचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. यामध्ये तिच्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या शोमधील काही फोटोंचा समावेशही आहे.

कार्तिकीच्या घरातील या फोटो फ्रेममध्ये कार्तिकी लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, अशोक सराफ यांसारख्या अनेक दिग्गज लोकांबरोबर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या फोटोफ्रेमवर ‘आठवण सोनेरी क्षणांची’ असं लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर कार्तिकीची स्वत:ची खोलीही अगदी भव्य असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आकर्षक इंटीरियरसह, उत्तम रंगाने तिची ही खोली सजली आहे. त्याचबरोबर या खोलीमध्ये कार्तिकीचे तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटोही पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, कार्तिकीने रोनित पिसेबरोबर २०२० मध्ये विवाहगाठ बांधली होती. त्यांच्या या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. त्यामुळे कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे