बॉलिवूडचा लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. करण जोहर याच्या या शोची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिलेली असते. या कार्यक्रमात कोणते कलाकार येणार, करण जोहर सोबत होणाऱ्या गप्पा यांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. अशातच ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाची घोषणा झाली तेव्हापासून साऱ्यांची उत्सुकता वाढली. ‘कॉफी विथ करण ८’च्या भागात बॉलिवूडमधील लोकप्रिय कपिलची एंट्री पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ही जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. (Koffee With Karan 8)
रणवीर व दीपिकाच्या येण्याने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. दरम्यान कार्यक्रमातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका व रणवीर यांच्या लग्नातील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. रणवीर दीपिकाच्या लग्नातील हे खास क्षण पहिल्यांदाच साऱ्यांचा पाहायला मिळाले. रणवीर-दीपिकाच्या लग्नात नातेवाईकांना मोबाइल वापरण्यास निर्बंध असल्याने त्यांच्या लग्नातील कोणतेच व्हिडीओ वा फोटो समोर आले नव्हते. अखेर त्यांच्या लग्नाच्या ५ वर्षांनी दोघांनीही ‘कॉफी विथ करण’मध्ये त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.
रणवीर-दीपिकाच्या लग्नातील हे खास क्षण पाहून करण जोहर भावुक झाल्याचं ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात पाहायला मिळालं. आयुष्यात एकटं असल्याचं दुःख त्याने साऱ्यांसमोर मांडलं. व्हिडीओमध्ये करण असं बोलताना दिसत आहे की, “मी सध्या कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाही. मी सिंगल आहे. आता हा व्हिडीओ पाहून मी आयुष्यात काय मिस करतोय याची जाणीव मला झाली. रिलेशनशिपमध्ये राहणं नक्कीच कठीण असतं पण, आयुष्यातील कठीण प्रसंगात तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर असणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. माझ्या या कार्यक्रमात मी एवढा भावुक केव्हाच झालो नव्हतो. तुमचं हे प्रेम पाहून माझं पोट भरलं, असं मी म्हणेन.”
भावुक झालेल्या करण जोहरला धीर देत त्याची प्रतिक्रिया ऐकून रणवीर-दीपिका त्याला जवळ घेत आधार देतात आणि आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत, असं सांगतात. ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. शिवाय रणवीर दीपिकाच्या लग्नातील खास क्षण पाहता चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदरही वाढला आहे.