अभिनेता शशांक केतकरने त्याच्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. आजवर शशांकने कित्येक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून श्रीच्या भूमिकेतून शशांक घराघरांत पोहोचला. त्याची या मालिकेतील भूमिका आजही समस्त प्रेक्षकवर्गाच्या आठवणीत आहे. सध्या शशांक ‘मुरंबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतीलही त्याच्या भूमिकेचं कौतुक होतं आहे. (Shashank Ketkar New Project)
मालिकाविश्वात यश संपादन केल्यानंतर शशांक चित्रपटसृष्टीकडे वळला. इतकंच नव्हेतर हिंदी वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हिंदी सिनेसृष्टीतही शशांकचा खूप मोठा चाहतावर्ग असलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच तो ‘स्कॅम २००३’ या तेलगी घोटाळ्यावर आधारित सीरिजमध्ये झळकला होता. यानंतर आता अभिनेत्याने आता चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे.
एका बिग बजेट सीरिजमध्ये अभिनेता महत्त्वपूर्ण कामगिरी करताना झळकणार आहे. ‘धर्मा प्रोडक्शन’ म्हणजेच करण जोहरच्या आगामी ‘शो टाइम’ या वेबसीरिजमध्ये तो एक लहानशी भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची झलक पाहणं रंजक ठरणार आहे. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावरून शशांकने शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ‘धर्मा प्रॉडक्शन’च्या ऑफिसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. याचबरोबर कॅप्शन देत त्याने, “८ मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ पाहायला विसरू नका. जेव्हा मी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’. भूमिका लहान आहे पण नक्कीच आठवणीत राहील” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. करण जोहरच्या ‘शो टाइम’ या सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकारही पाहायला मिळणार आहेत.