बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर व त्याच्या भूमिकेला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादानंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. ९०च्या दशकामध्ये ‘सोल्जर’, ‘गुप्त’, ‘बिच्छु’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटामध्ये अगदी कमी वेळेच्या भूमिकेमध्येदेखील बॉबी देओलची भूमिका भाव खाऊन गेली आहे. त्याचप्रमाणे ‘आश्रम’, ‘रेस ३’ यामध्ये देखील त्याने दमदार भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. (Bobby Deol Shares Incident)
या चित्रपटांमध्ये काम करताना पडद्यामागील कोणत्या गमती जमती घडत होत्या याबाबतचा किस्सा समोर आला आहे. फिल्मफेअरला २३ वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमधील एक किस्सा नुकताच चर्चेत आला आहे. १९९७मध्ये आलेल्या ‘गुप्त’ चित्रपटामध्ये बॉबीबरोबर काजोल व मनीषा कोईरालासह काम केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मनीषा कोईरालाबरोबर एक रोमँटिक सीन देत असताना तिच्या तोंडाला दुर्गंधी येत असल्याचे त्याने सर्वांसमोर सांगितलं. ‘बेचैनिया’ हे गाणे शूट करताना चेहऱ्याजवळ तोंड जवळ आणायचे होते पण मनीषाच्या तोंडाला दुर्गंधी येत असल्याने कसाबसा तो सीन शूट करुन संपवला असल्याचे त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.
बॉबी एवढ्यावरच न थांबता मनीषाच्या तोंडाला कांद्याचा वास येत असल्याचेदेखील त्याने सांगितले. सीन शूट करण्यापूर्वी मनिषाने चणाचाट व कच्चा कांदा खाल्ला होता. हा वास इतका होता की सीन चित्रित करताना अक्षरशः त्याला त्याचा श्वास रोखून धरावा लागत असे आणि असे करुन तो रोमँटिक सीन यशस्वीरित्या चित्रित झाला.
त्यांनतर घडल्याप्रकाराचा बदला घेण्यासाठी बॉबीने सेटवरच एक युक्ती आखली. त्याने फाईट मास्टर आणि मनीषाच्या भावाचा रोल करणाऱ्या अभिनेत्याला सीन चित्रित करण्याआधी कांदा खायला सांगितले आणि काजोल व मनीषाबरोबर एक एक सीन चित्रित करायला लावला. हा सर्व प्रकार सांगताना बॉबी अगदी दिलखुलास हसत होता. ‘ॲनिमल’च्या दमदार यशानंतर बॉबी आता ‘हरी हरा वीरा मल्लू’, ‘कानगुवा’, ‘NBK१०९’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.