सिनेसृष्टीत काम करत असताना प्रत्येक कलाकाराला ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतो. बरेच कलाकार या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत असतात तर काहीजण या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकला आहे. लग्न करून आईसाठी टाइमपास म्हणून सून आणायला सांगणाऱ्या ट्रोलर्सला करण जोहरने चोख प्रतिउत्तर देत त्याची बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. (Karan Johar Answers To Trollers)
नुकताच करणने सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये ट्रोलरची कमेंट होती की, “आईचा वेळ जात नसेल ना. तिच्यासाठी सून घेऊन ये एक” असं म्हटलं. ही ट्रोलरची कमेंट करणला काही पटली नाही, “माझ्या आयुष्याच्या निवडींवर ट्रोल करणाऱ्या सर्व ट्रोलर्सपैकी, मला ही कमेंट खूप अपमानास्पद वाटली. सर्वप्रथम, कोणतीही सून तिच्या सासूसाठी टाईमपास नसते. तिची स्वतःची ओळख असते. तिला तिच्या आवडीनुसार वेळ घालवण्याचा अधिकार आहे, मग तो वैयक्तिक असो वा व्यावसायिक” असं त्याने म्हटलं आहे.
करणने पुढे पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “माझी आई माझ्या मुलांचे म्हणजेच रुही व यश जोहरच्या संगोपनात व्यस्त आहे. तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही सुनेची गरज नाही”. त्याने पुढे लिहिले आहे की, “तिचे आयुष्य आम्हाला प्रेम देण्यात पूर्ण होते आणि आम्ही देखील तिच्यावर खूप प्रेम करतो. तसेच सून आणणे हा पर्याय नाही. मी हे त्या लोकांना सांगत आहे ज्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि नातेसंबंधांची इतकी काळजी आहे”.
करणने पुढे लिहिले आहे की, “माझी मुले भाग्यवान आहेत की त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझी आई मिळाली. जर मला आयुष्यात जोडीदाराची गरज असेल तर मी ते स्वतःसाठी करेन. आयुष्यातील पोकळी दूर करण्यासाठी मी लग्न करेन, दुसऱ्यासाठी नाही. माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.