Kamali Promo Shocking Twist : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या अतिशय मनोरंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील कमळी आणि ऋषीच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता निखिल दामले आणि अभिनेत्री विजया बाबर यांच्या जोडीला ही रसिक प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत आहे. याशिवाय सध्या मालिकेत कमळीने अखेर कामिनीचं खऱ्या अर्थाने सत्य इनामदार कुटुंबासमोर उघड केलं आहे. कमळीच्या या धाडसामुळे कामिनीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असून, कामिनीचा प्रचंड संताप झालेला दिसून येते आहे. सत्य उघडकीस आल्यानंतर कामिनी कमळीला थेट धमकावताना पाहायला मिळते. या सगळ्यामुळे कमळी मानसिकदृष्ट्या घाबरलेली असते.
दरम्यान, झी मराठी वाहिनीने मालिकेचा एक जबरदस्त नवा प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या प्रोमोमध्ये कामिनी कमळीला धडा शिकवण्यासाठी एक धक्कादायक कटकारस्थान रचताना दिसते. विशेष म्हणजे या कारस्थानात अनिकाही तिची साथ देत असल्याचं स्पष्टपणे दाखवण्यात आलं आहे. या नव्या प्रोमोमध्ये कमळी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखवण्यात आली आहे. तिच्या प्रकृतीची अवस्था गंभीर असून, तिला रक्त चढवण्यासाठी सलाईन लावलेली असते. याच वेळी कामिनी रुग्णालयात येते आणि कोणाच्याही लक्षात न येता ती रक्ताची सलाईन कापते. या धक्कादायक कृतीमुळे कमळीचा जीव धोक्यात येतो.
कमळीची ही गंभीर अवस्था पाहून ऋषी पूर्णपणे हादरून जातो. तो कमळीला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आणि तात्काळ तिला मॅच होणारा ब्लड ग्रुप शोधण्याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान प्रोमोमध्ये एक भावनिक व महत्त्वाचा क्षण दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये राजन महाजन जे प्रत्यक्षात कमळीचे बाबा आहेत. ते कमळीला रक्तदान करताना दिसतात. आता मालिकेत राजन हेच कमळीचे बाबा असल्याचं सत्य सर्व इनामदार कुटुंबासमोर उघड होणार का? कमळीचा जीव या संकटातून वाचेल का? आणि कामिनी पुढे कमळीला त्रास देण्यासाठी आणखी कोणते डाव खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार असून, हा ट्रॅक प्रेक्षकांसाठी अत्यंत थरारक ठरणार आहे.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध गायक, आनंद साजरा करत शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्यात पुन्हा…”





