Junior Mehmood Passes Away : ७०च्या दशकातील दिग्गज ज्युनियर महमूद यांचं वयाच्या ६७व्या वर्षी निधन झालं आहे. आपल्या कॉमेडी अभिनयाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या अभिनेत्याला पाहून आज लोकांचे डोळे पाणावले आहेत. ज्युनियर महमूद रुग्णालयातून घरी परतल्यापासून त्यांच्या अखेरच्या दिवसांशी ते लढा देत होते. त्यांच्या प्रकृतीची बातमी कळताच अलीकडे अनेक बॉलीवूड कलाकार त्यांना भेटायला आले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. ज्युनियर महमूद यांनी एका न्यूज चॅनलसह संपर्क साधला तेव्हा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली.
ज्युनियर महमूद गेल्या काही काळापासून फुफ्फुस व यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पसरला होता आणि त्यामुळे त्यांचं वजनही सतत कमी होत होतं. सध्याची त्यांची अवस्था पाहून बॉलीवूडमधील त्यांचे अनेक मित्र खूप काळजीत असलेले पाहायला मिळाले. अशातच एका न्यूज चॅनेलसह बोलताना अभिनेत्याने आपली इच्छा व्यक्त केली.
मागील दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती आजारपणामुळे खालावत चालली होती. त्यांनी त्यांच्या या कॅन्सरच्या शेवटच्या दिवसांत आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या मृत्यूनंतर या जगाने केवळ हा व्यक्ती चांगला माणूस होता इतकंच बोलावं. चार लोक जरी हे बोलले तरी आपला विजय झाला असं समजा’ असं म्हणत त्यांनी आपली ही शेवटची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.
ज्युनिअर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद होतं. त्यांनी सात भाषांमध्ये २६५ सिनेमांहून अधिक सिनेमात काम केलं होतं. बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सिनेसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती.