हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते गेले काही दिवस गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांना पोटाचा कर्करोग झाला होता. महमूद यांचं ६७व्या वर्षी निधन झालं आहे. हिंदी सिनेसृष्टीत ९० दशकापर्यंत त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या आजाराबद्दल कळताच सिने जगतातील बरेच कलाकार त्यांना भेटण्यासाठी गेले होते.(actor junior mehmood passes away)
महमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांच्या हा आजार चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. गुरुवारी मध्यरात्री २ वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेजगताला मोठा धक्का बसला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ज्युनियर महमूद यांच्या निधनाची बातमी त्यांच्या एका मित्राने दिली. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आजाराबाबत चौथ्या स्टेजच्या कर्करोगामुळे त्यांना होत असलेल्या वेदनांबद्दल सांगितलं. त्यांच्या मुलाने याबद्दल बोलताना सांगितलं, “आम्हाला त्यांच्या पोटाच्या कॅन्सरबद्दल आणि चौथ्या स्टेजबद्दल १८ दिवसांपूर्वी कळलं. आम्ही त्यांना त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की या स्टेजवर त्यांचे उपचार व किमोथेरपी ही खूप वेदनादायक असेल”.
त्यांच्या आजाराचं वृत्त समोर येताच अभिनेता जॉनी लिवर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली होती. महमूद यांना त्यांच्या बालपणीच्या मित्रांना म्हणजेच अभिनेता सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना भेटायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सचिन व जितेंद्र यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.