स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर या मालिकेतील सायली-अर्जुन यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावतेय. या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर मालिकेसंबंधित अनेक पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकतीच केलेली एक पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेसंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे तिने मालिकेतील नवीन ट्विस्टबद्दल सांगितले आहे. जुईन या पोस्टमध्ये “ज्या गोष्टीची तुम्ही सर्व वाट पाहत आहात ती लवकरच खरी होणार आहे.” असं म्हणत “सत्याचाच विजय होणार” असंही म्हटलं आहे. पण जुई नेमकं असं का म्हणाली? हे कळण्यासाठी तिने प्रेक्षकांना व चाहत्यांना ‘ठरलं तर मग’ ही मालिका पाहण्याचा सल्ला दिला आहे.
अशातच नुकताच स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अर्जुन व चैतन्यच्या बिघडलेल्या नात्याबद्दल सर्वांनीच सायलीला जबाबदार मानले आहे. अर्जुन-चैतन्य या दोन भावांमधील भांडणं सायलीला माहिती असूनही तिने याबद्दल कुणालाच काही सांगितले नाही. असा आरोप तिच्यावर करण्यात येतो.
दरम्यान, या सगळ्यात अर्जुन सायलीला पाठिंबा देत माझ्या आणि चैतन्यमधील भांडणात सायलीचा काहीही संबंध नाही असं म्हणतो. त्यामुळे सायली म्हणजेच जुईने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे व नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमुळे अनेक प्रेक्षकांना पुढील भागात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.