सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. हिंदी बिग बजेट चित्रपट येऊनही हा चित्रपट अद्याप बॉक्सऑफिसवर हाऊसफुल असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या कथानकाने व चित्रपटातील कलाकारांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करत आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, अभिनेता सिद्धार्थ जाधव या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय. (Rinku Rajguru New Post)
‘झिम्मा २’ मध्ये दोन चेहरे आले असल्याचं कळतंय. शिवानी सुर्वे व रिंकू राजगुरू ही दोन नवी पात्रे दिग्दर्शकाने चित्रपटात घेतली आहेत. मराठमोळ्या रिंकूने ‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ‘सैराट’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ मध्ये रिंकूने सुनेची भूमिका साकारली होती. रिंकू अभिनयासह सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. तिचे चाहते नेहमीच तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारताना दिसतात.
अशातच सोशल मीडियावरून केलेल्या रिंकूच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपलं लग्न झालं नसलं तरी आपल्याला कशी सासू हवी आहे हे तिने या पोस्टमधून सांगितलं आहे. या पोस्टमध्ये तिने एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केला असून आपल्याला अशीच सासू हवी आहे, असं लिहिलं आहे.अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा फोटो रिंकूने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘माझं लग्न झालेलं नाही पण, सासू पाहिजेल तर अशी. उनो उनो उनो’ तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये सध्या बरीच व्हायरल झाली आहे.
‘झिम्मा २’ या चित्रपटात निर्मिती व रिंकू यांची सासू- सुनेची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. त्यामुळे रिंकूने शेअर केलेल्या ‘अशी सासू हवी’ या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे.