ड्रामा क्वीन या नावाने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. आजवर राखीने तिच्या बिनधास्त व बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःची अशी वेगळीच छाप पाडली. राखी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना हसवायला ती कधीही मागे पुढे पाहत नाही. मनोरंजन हे राखीचं ब्रीदवाक्य आहे. राखी सावंत ही कुणीही वारसा नसताना स्वमेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत रुजू झाली. (Rakhi Sawant Struggle Story)
मुळात राखीचं खरं नाव राखी सावंत नसून तिचं खरं नाव वेगळंच आहे, याबाबतचा खुलासा राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान केला आहे. यावेळी केवळ खरं नावंच नव्हे तर तिने तिच्या सुरुवातीच्या कठीण काळाबाबतही भाष्य केलं आहे. राजीव खंडेलवालच्या ‘ज ज्बात’ नावाच्या शोमध्ये राखी सहभागी झाली होती. या शोमध्ये राखीचं खरं नाव समोर आलं होतं. राजीव याने राखीचं स्वागत करताना ‘आज या शोमध्ये कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही. कारण मी आज राखी सावंतशी नाही तर निरू भेडा हिच्याशी बोलणार आहे’, असं म्हटलं.
स्वतःचं खरं नाव ऐकून राखी थोडी गोंधळते, आणि तिला धक्काच बसतो. नाव ऐकून राखी आश्चर्यचकित होते आणि ती तिचं खरं नाव नीरू असल्याचे सांगते. राखीने पुढे सांगितले की, तिला तिच्या भूतकाळाबद्दल आणि सत्याबद्दल बोलायला भीती वाटते. तिला हे देखील आठवते की तिच्या आईने तिला सांगितले होते की ती लहान असताना अनेकदा शेजाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यातून अन्न उचलायची.
नृत्य व अभिनयासाठी तिच्या कुटुंबातील कोणीही तिचे कौतुक केले नाही, असे सांगून राखी म्हणाली, ‘मला घरी परवानगी नव्हती. मी थोडंसंही नाचले आणि ते आईला कळले तर ती मला बेदम मारायची. यापुढे राखी असंही म्हणाली, ‘माझ्या कुटुंबात मुलीने नृत्य करावे की नाही हा प्रश्नच चुकीचा होता. मी पुढे जाण्यासाठी आयुष्यात खूप मार खाल्ला आहे, आणि त्याच्या माझ्या अंगावर खुणा आहेत. मी अशाच परिस्थितीत वाढले आहे’.