‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले आहे. जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत मी माझा सुपरहिरो गमावला असल्याची भावूक प्रतिक्रिया जयने व्यक्त केली. जयने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते”.
जयने वडिलांच्या निधनाबद्दलची पोस्ट शेअर करताच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जयचे अनेक मित्रपरिवाराने त्याला कमेंट्सद्वारे खंबीर राहण्याविषयीही सांगितले आहे. गायत्री देशमुख, पूर्वा शिंदे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शाह, आरोह वेळणकर, अक्षय वाघमारे आदी अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे जयला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

गायत्री दातारने जयला आधार देत असं म्हटलं आहे की, “ही बातमी पाहून वाईट वाटले. तुझ्या वडिलांचा पुढचा प्रवास शांतमय होवो. तुला या कठीण काळातून पुढे जाण्यासाठी देव बाल देवो. ओम शांती” तर उत्कर्षने जयच्या वडिलांबद्दल त्याचया भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “एक महान आत्मा सर्वकाळ सर्वांची सेवा करतो. महान आत्मा कधीही मरत नाही. आम्ही तुझ्या वडिलांची काय आठवण काढू. जय माझ्या भावा या कठीण काळात खंबीर रहा मित्रा”. तसेच विकास पाटीलनेही “या कठीण काळात आम्ही सर्व तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाबरोबर आहोत”.

तसेच आरोह वेळणकरने या पोस्टखाली “ही खूपच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. देव तुला शक्ती देवो. आम्ही सर्व तुझ्यारोबर आहोत. ओम शांती” अशी कमेंट केली आहे. यासह अनेक कलाकारांनी या पोस्टखाली ऑम शांती, खूपच दु:खद बातमी, तुला देव शक्ती देवो” अशा अनेक कमेंट्सद्वारे जयचे सांत्वन केलं आहे. त्याचबरोबर त्याला या कठीण काळात खचून न जाता खंबीर राहण्याचा प्रेमल सल्लाही दिला आहे.