मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या मोठ्या भावाच्या बायकोचं निधन झाली असल्याची बातमी समोर आली आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं आकस्मिक निधन झालं असल्याचं कळलं आहे. याबाबतची एक भावुक पोस्ट हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टवरील कॅप्शनने हार्दिक खचलेला असल्याचं कळतंय. जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी हार्दिकने पोस्ट शेअर करत दिली आहे. (Hardeek Joshi Emotional Post)
हार्दिकचे व त्याच्या वहिनीचे घट्ट नाते होते. आई, बहीण, मैत्रीण, वहिनी अशी सर्वच नाती त्या पार पाडत होत्या. हार्दिकने त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाही आहेस, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. ‘जाऊ बाई गावात’ हा झी मराठीवरील नवीन शो मी करत आहे तो फक्त तुझ्यामुळे. तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करत आहे कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होत की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारचं आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरपासून हा शो टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे”.
हार्दिकने पुढे लिहिलं आहे की, “मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. मिस यु ज्योती वहिनी. माझी लाडकी वहिनी मला कधीचं विसरु नको. खूप प्रेम आणि मला तुझी खूप आठवण येत राहील” असं म्हणत त्याने ही भावुक पोस्ट शेअर केली आहे.
लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा रिअॅलिटी शो येत आहे. येत्या ४ डिसेंबरपासून त्याचा हा नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा टायटल ट्रॅक नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि या टायटल ट्रकला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.