Women Special Article : कालचीच गोष्ट बाजूच्या वहिनीला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या म्हणून तात्काळ तिला रुग्णालयात नेलं. पहाटेच्या तीन वाजल्यापासून तिची बेचैनी वाढलेली दिसली. नीट झोपताही येईना, ना नीट बसताही येईना काय करु काय नको असं तिचं सुरु होतं आणि शेवटी तिला हॉस्पिटलला नेलं. तिथं गेल्यावर कळलं की या वेदना सामान्य आहेत आणखी वेदना वाढल्या की डिलिव्हरी होईल. बापरे… ऐकून काटा आला. या वेदना सामान्य??? अरे त्या बाईला होतच नव्हतं त्या वेदना सामान्य… म्हणजे आणखी वेदना सहन होणाऱ्या तरी असतील का?, असा आपसूक प्रश्न पडला. पहाटेच्या तीन वाजल्यापासून वेदनांनी कळवळणारी ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये घिरट्या घालत होती.
सारखेच तिचे डोळे हॉस्पिटलच्या दाराकडे होते, आता डॉक्टर येतील आणि मला मोकळं करतील असं तिला वाटत होतं. अन्नाचा दाना पोटात नसताना तिला काही सुचेनासंही झालेलं. पहिलं बाळंतपण असल्याने तिची आई तिच्या जवळ होती. पण पोटच्या लेकीच्या वेदना तिलाही पाहवत नव्हत्या. शेवटी एक आईच एका आईच दुःख समजू शकते. हे सर्व सुरु असतानाच शेवटी डॉक्टर आले आणि त्यांनी तिला ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं आणि सीझर करायचा निर्णय ठरला…काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि साऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हो. मुलगा झाला…साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
आणखी वाचा – “सर्व दोषांसह स्वीकारुन लग्न करणं अवघड”, नवऱ्याबद्दल बोलताना हिना खान ढसाढसा रडली, म्हणाली, “हा माझ्यासाठी…”
वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. आजी, आत्या, मामी, मावशी, काका सगळे सगळे भावुक होते. थोड्या वेळाने डॉक्टरांनी बाळाला बाहेर आणलं तर त्या निरागस चेहऱ्याकडे सगळेच पाहत राहिले . या सगळ्यात त्या आईचा दुसरा जन्मच झाला. बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात ते चुकीचं नाही. असह्य वेदना सहन केल्यानंतर त्या चिमुकल्याला जन्म देणाऱ्या त्या आईचा हा नऊ महिन्याचा प्रवास संपला. मुलगा झाला म्हणून सगळेच खुश होते… तितक्यात एक वाक्य हळूच कानावर आलं…बरं झालं मुलगा झाला???, आणि हे वाक्य खूप खटकलं.
आणखी वाचा – शूटिंगचा अखेरचा दिवस अन् डोळ्यांत पाणी, ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘या’ दिवशी घेणार निरोप, कलाकार भावुक
बरं झालं मुलगा झाला अरे मुलगी झाली असती तर बरं नसतं झालं का?, असं विचारावं वाटलं पण आनंदावर विरजण म्हणून शांत राहिले. आताच्या या एकविसाव्या शतकात हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे. त्या एका आईच्या असह्य वेदनेनंतर मुलगा झाला काय की मुलगी झाली याबाबत चर्चा करणं योग्य आहे का?. आज अंतराळात जाणारी सुनीता व्हील्यम्स महिलाच आहे ही एकच बाब यासाठी पुरेशी आहे, असं वाटतं.





