Maitricha Saatbara Episode One : ‘मैत्रीचा ७/१२’ या मराठी वेबसीरिजबाबत असणाऱ्या सगळ्यांच्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काल या सीरिजचा पहिला वहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या वेबसीरिजच्या अगदी पहिल्या भागालाही चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. वेबसीरिजच्या पहिल्या भागात आपणा सर्वांना पात्रांची ओळख करुन दिली. या सीरिजच्या पहिल्या भागातच सीरिजमध्ये असणाऱ्या आदित्य, दौलत, छाया, सिद्धार्थ, संचिता आणि योगिता या सहा पात्रांची नव्याने ओळख घडली. ही सहा पात्रे, त्यांचे भिन्न-भिन्न स्वभाव, त्यांच्यातील गुणदोष हे सीरिजच्या पहिल्याच भागात थोडक्यात कळलं असं म्हणायला हरकत नाही. सहा वेगळ्या मताच्या पात्रांभोवती फिरणारी ही रंजक कथा आता सुरु झाली आहे.
सीरिजच्या पहिल्याच भागात दौलत, आदित्य आणि सिद्धार्थ यांच्याबरोबर संचिताची ओळख विशेष होती. फेरीवाले म्हणणाऱ्या आदित्यला संचिताने तिच्याच भाषेत उत्तर देत त्याची बोलती बंद केली तर अगदी पहिल्या भेटीपासून दौलतने दाखवलेला माज संचिताला खटकला. या सगळ्यात शहाणपणाने वागणारा एकमेव होता तो म्हणजे सिद्धार्थ. सिद्धार्थने संचिताची विचारपूस करत तिला पाणी दिले आणि घरात घेत तिचा चांगलाच पाहुणचार केला. या सगळ्यानंतर एंट्री झाली ती म्हणजे योगिताची. योगिताची तीनही मुलांबरोबर चांगलीच मैत्री दिसली, तर संचिताची शाळा घेतल्याने ती थोडीशी रागावली. मात्र, नवीन पाहुणी राहायला येणार असल्याचं ती सांगायला विसरली म्हणून तिने माफीही मागितली.
थोडक्यात पाहुणचार झाल्यानंतर आणि फ्रेश झाल्यानंतर संचिताने स्वतःची ओळख करुन दिली. यापूर्वी घरातील सर्वांना कळलं होतं की या घराच्या मालकीण माईंची ती भाची आहे. त्यामुळे सगळेच थोडे धास्तावले. एकमेकांची ओळख झाल्यानंतर संचिता कामानिमित्त तिच्या खोलीत जाते. तेव्हा जिन्यावरील पसारा, मुलांच्या खोलीतील पसारा पाहता तिचा पारा चढतो आणि सरळ ती खाली येत हॉलमधील नियमांच्या फळ्यावर स्वच्छतेचा नियम वाढवते.
आणखी वाचा – ‘गॉसिप गर्ल’ फेम अभिनेत्रीचं वयाच्या ३९व्या वर्षी निधन, संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांना मोठा धक्का
हे पाहून सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर अर्थात पेशाने वकील असणारा दौलत ऑब्जेक्शन घेतो आणि संचिताला रोखण्याचा प्रयत्न करतो. मात्र संचिता स्वच्छतेची बाजू अचूक मांडते आणि घरातील तीनही मुलांना घर स्वच्छ करायला भाग पाडते. या दरम्यान त्या पसाऱ्यात आदित्यला त्याच्या कधीही न सापडणाऱ्या काही जिवलग गोष्टी मिळतात, ते पाहून संचिता त्याच्यासाठी लकी असल्याचंही तो म्हणतो. आता संचिता तिच्या बॉसगिरीने घर कसं ताब्यात ठेवणार?, की ही मुलं तिची शाळा घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.