Pranit More’s Parents Reaction: हिंदी बिग बॉसच १९चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला. काल (7 डिसेंबर) या शो चा ग्रँड फिनाले पार पडला. टीव्ही अभिनेता गौरव खन्ना बिग बॉस १९चा विजेता ठरला. प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट हे सदस्य टॉप तीन पर्यंत पोहोचले. पण प्रणितचं इविक्शन झाल्यामुळे तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. प्रणित मोरेला प्रेक्षकांचा दणदणीत पाठिंबा मिळाला. तो जिंकेल अशी सर्वांना आशा होती पण त्याला टॉप 3 मध्ये समाधान मानावे लागले. या निकालामुळे प्रणित व त्याचे चाहते निराश झाले. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जरी त्याने पटकावली नसली तरीही त्याने अनेकांची मनं जिकंली. दरम्यान प्रणितचा ‘बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतर त्याच्या आईने प्रणितबद्दल प्रतिक्रिया दिली.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबीयांनाही प्रणितबद्द्दल विचारण्यात आलं. अशातच आता प्रणितच्या आईनेही त्याचं भरभरून कौतुक केलं. प्रणितमुळे त्यांना लोक ओळखत आहेत असं त्याच्या आईने म्हटलं. ‘टेली मसाला’शी बोलताना प्रणितच्या आई म्हणाल्या, “आम्ही खूप खूप आनंदी आहोत म्हणजे आता लोक आम्हाला त्याच्या नावाने ओळखत आहेत. प्रणितची आई. प्रणितचे बाबा जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा सगळे विचारतात, तुम्ही प्रणितच्या आई आहात ना? हे ऐकून खूप छान वाटत.” प्रणित शोमध्ये अनेकदा भावुक झाला तेव्हा तुमच्या काय प्रतिक्रिया असायच्या असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या, “आम्हीसुद्धा तेव्हा खूप भावुक झालेलो. मी आयुष्यात कधी इतकी रडली नाही, जितकी मी तीन साडे तीन महिन्यात त्याला रडताना पाहिल्यानंतर रडले आहे.”
प्रणित जिंकला नाही याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “आम्हाला खंत वाटत नाही. गौरव जिंकला त्याचाही आम्हाला आनंद आहे. प्रणित तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडला याचा आम्हाला आनंदच आहे आणि आमच्यासाठी तो विजेताच आहे. तो जिंकला असता तर आनंदच झाला असता, पण त्याला मिळणारं प्रेम पाहून आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. आमच्यासाठी तोच विजेता आहे.” याचबरोबर प्रणितच्या वडिलांनीही त्याच कौतुक करत म्हटलं की, “तो जिंकला नाही याची खंत नाही, ‘बिग बॉस मराठीसाठी त्याची निवड असं आम्हाला वाटलं होतं, पण हिंदीसाठी त्याची निवड झाली; चांगली गोष्ट आहे, त्याने सलमान खानबरोबर काम केलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.”




