बॉलिवूड सिनेसृष्टीमधून सध्या एकामागोमाग एक वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशातच एका मराठमोळ्या व बॉलिवूड अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकर बाबत खूप मोठा खुलासा समोर आला आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकरने पती टिमी नारंगला घटस्फोट दिला असल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मुलीसह घरही सोडले आहे. ४७ वर्षीय इशा कोप्पीकरने २००९ मध्ये व्यवसायाने हॉटेलियर असलेल्या टिमी नारंगशी लग्न केले. दोघांना नऊ वर्षांची मुलगीही आहे. (Isha Koppikar Divorce)
इशा व टिमीचे १४ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपलं आहे. लग्नाच्या १४ वर्षांनी दोघेही वेगळे झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. इशा कोप्पीकरच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. इशा व टिमी नारंग त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. मात्र काही काळापासून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सूत्रांनी ETimes ला सांगितले की, “इशा व टिमी नारंग वेगळे झाले आहेत कारण त्यांच्यात आवड सुरु होते. दोघांनी लग्न वाचवण्यासाठी , मुलीसाठी एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही” असं समोर आलं आहे.
सूत्राने सांगितले की,”इशा व टिमी नारंग यांनी त्यांचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते साध्य झालं नाही. अखेर त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर इशा कोप्पीकरने आपल्या मुलीसह घर सोडले. आता ती वेगळ्या ठिकाणी राहत आहे” असं सांगण्यात आलं. याबाबत इशा कोप्पीकरसह ‘इटाइम्स’ने संपर्क साधला असता ती म्हणाली, “काहीही सांगण्यासारखे राहिले नाही. आता काही घाईत बोलणं चुकीचं ठरेल. मला काही गोष्टी आता समोर आणायच्या नाहीत”.
ईशा कोप्पीकर व टिमी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले. एकमेकांना डेट करण्यापूर्वी इशा व टिमी तीन वर्षे मित्र होते. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर इशा सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ‘एक था दिल एक थी धडकन’ या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनतर अभिनेत्रीने ‘फिजा’, ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘कंपनी’, ‘कांटे’, ‘डॉन’, ‘क्या कुल हैं हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.