मनोरंजन सृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या काही पुरस्कारांपैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची एक अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. तर श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. मोदी सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना काळात ही चर्चा केली होती आणि एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे सरकारने नेमलेल्या समितीनेच्या बदलांनुसार, आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचा उल्लेख केवळ दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलून राष्ट्रीय, सामाजिक व पर्यावरणाला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म असे ठेवण्यात आले आहे.
इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळण्याचे नेमके कारण काय? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असणारे रोख पारितोषिक १० लाख रुपयांवरून १५ लाख रुपये इतके करण्यात आले. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम ३ लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी २ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार बक्षिसाची रक्कम ही वेगवेगळी होती.