बॉलिवूड गायक राहुल वैद्य सध्या खूप चर्चेत असलेला पाहायला मिळतो. सध्या तो कलर्स चॅनलवरील कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ’मध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तो अभिनेता अली गोनीबरोबर दिसून येत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी तो अभिनेत्री दिशा परमारबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांचे लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. तिचेदेखील अनेक गोड फोटो पाहायला मिळतात. अशातच आता राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या करियरच्या सुरुवातीचा काळ कसा होता? हे समोर आले आहे. (rahul vaidya indian idol audition video)
राहुलचा ऑडिशनदरम्यानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सोनू निगम व अनु मलिकदेखील दिसून येत आहेत. यावेळी त्याच्या अतिआत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. तो उपविजेता होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस १४’ व ‘खतरो के खिलाडी ११’मध्येही दिसून आला होता. यामध्ये तो फायनलपर्यंतदेखील पोहोचला होता.
दरम्यान ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सोनू, फराह खान व अनू मालिक यांच्यासमोर ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘प्रिटी वुमन’ हे गाणं गात होता. हे गाणं ऐकून परीक्षकांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभावदेखील बघायला मिळाले. त्याचे गाणं ऐकून सोनूचा खूप थंड रिप्लाय पाहायला मिळाला. तो राहुलला म्हणाला की, “मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमचा परफॉर्मन्स खूप वाईट होत चालला आहे. जे तुम्ही पहिल्यांदा गायलं होतत ते इतकं चांगलं होतं की अनू सरांनी तू खूप पुढे जाणार असेही म्हंटले होते”.
पुढे तो म्हणाला, “मी पण म्हटलं होतं की तुम्ही अंतिम तीन स्पर्धकांमध्ये असाल. पण नंतर तुम्ही जे गायलं ते खूप खराब होतं. तसेच तुम्ही जे काल गाणं गायल तेदेखील चांगलं नव्हतं. आज तुम्ही खूपच वाईट गायला आहात”. त्यानंतर अनू यांनीदेखील राहुलला सांगितलं की, “स्वतःवर खूपच आत्मविश्वास आहे. असं का? डोळ्यात, चेहऱ्यावर एक घमंडी पणा दिसून येतो. दुसरं कोणी नाहीच आहे असं झालं आहे तुझं”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.