‘इंडियन आयडल १२’चा विजेता व गायक पवनदीप राजनचा ५ मेला भीषण अपघात झाला. या घटनेला आता जवळपास महिना पूर्ण होईल. कार अपघाताची तीव्रताही भयंकर होती. पवनदीपला यामध्ये गंभीर दुखापत झाली. शरीराच्या विविध भागांना फ्रॅक्चर होतं. अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र वेदना आणि अवस्था पाहता तात्पुरता उपचार करुन त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे पवनदीपवर जवळपास सहा तास शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्याचाही डॉक्टरांनी सल्ला दिला. ती शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. आता नक्की पवनदीप कसा आहे? याबाबत माहिती समोर आली आहे. (Singer pawandeep rajan discharged from hospital)
पवनदीपवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस त्याला रुग्णालयातच ठेवण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने हार मानली नाही. रुग्णालयात असताना पवनदीप गाणं गात स्वतःचं मनोरंजन करत होता. त्याने गाणं गातानाचे व्हिडीओही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. आताही त्याने एक आनंददायी पोस्ट शेअर केली आहे. पनवदीपला रुग्णालयामधून सोडण्यात आलं आहे. याचबाबत त्याने स्वतः माहिती दिली.
विमानात बसलेल्याचा फोटो पवनदीपने शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर भलताच आनंद दिसत आहे. तसेच चेहऱ्यावरही झालेल्या जखमा नाहीशा झाल्या आहेत. त्याने फोटो शेअर करत म्हटलं की, “रुग्णालयामधून मला सोडण्यात आलं आहे. आता मी पुन्हा घरी जात आहे. सगळ्यांनी मला पाठिंबा दिला, प्रेम दिलं, माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी मी मनापासून आभारी आहे”. पवनदीपचा अपघात झाला हे कळताच त्याचे चाहते चिंतेत होते. त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत होते. आता त्याला या सगळ्या प्रार्थनेचे फळ मिळालं आहे.
५ मेला पहाटे अमरोहा जिल्ह्यातील नॅशनल हायवे-९ येथे पवनदीपचा अपघात झाला. पवनदीप त्याच्या शोसाठी जात होता. मात्र त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. गाडी चालवत असताना त्याला डुलकी लागली. त्यानंतर कारने ट्रकला जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीमधूनच अपघाताचं कारण स्पष्ट झालं होतं. मात्र आता पवनदीप सुखरुप असल्यामुळे चाहते व कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.