बॉलिवूडमधील ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटाला लहान मुळांपासून ते अगदी वयस्कर वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यामध्ये बालकलाकार दर्शिल सफारीची भूमिका होती. तसेच आमिर खानदेखील दिसून आला होता. या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सितारे जमीन पर’ असून या २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच पुन्हा एकदा ‘तारे जमीन पर’ चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी या चित्रपटावर केलेले भाष्य चांगलेच चर्चेत आले आहे. (yograj singh on taare zameen par)
योगराज यांनी युट्यूबर समधीश भाटीयाबरोबर संवाद साधला. यामध्ये त्यांनी ‘तारे जमीन…’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी हा चित्रपट अत्यंत वाईट असल्याचे सांगितले आहे. तसेच मुलांना मोठं करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांनी सांगितले आहे. मुलं हे वडिलांच्या प्रभावाखाली मोठी होत असतात. ते म्हणाले की, “जे वडील बोलणार तेच मुलगा बनणार”. त्यावेळी त्यांना आमीरच्या ‘तारे जमीन…’बद्दल विचारले गेले. तेव्हा ते म्हणाले की, “हा खूपच वाईट चित्रपट आहे आणि मला असा चित्रपट बघायचा नाही”. त्यांचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमिरचा ‘तारे जमीन…’ हा चित्रपट २००७ साली चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात एका आठ वर्षांच्या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्याला डायलेक्सीया हा आजार असतो त्यामुळे त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये आमिरने इशानच्या कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप पसंतीदेखील मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची घोषणादेखील आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आधी हा चित्रपट नाताळच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र ही तारीख पुढे ढकलली गेली. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. मात्र कधी प्रदर्शित होणार? याबद्दलची माहिती अजून समोर आली नाही.