अभिनेत्री अक्षया देवधर हिने आजवर तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अक्षयाने लग्नानंतर काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरुन काही ना काही ती नेहमीच पोस्ट करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांबाबत जनजागृती करत एक संदेश दिला आहे. अभिनेत्रीने कर्करोगाबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. (Akshaya Deodhar Post)
अक्षयाने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “सध्या सर्वत्र कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. यावर नेमका उपाय काय? असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. सर्व्हायकल कॅन्सरवर एक वॅक्सीन आले आहे. भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. या लसीचं नाव एचपीव्ही वॅक्सीन असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, या लसीकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हती. काही महिलांमध्ये आजही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही.”
अक्षया पुढे म्हणाली, “मला याबाबत माहिती नव्हती. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. माझा व्हिडीओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला, मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. या लसीकरणाबाबत कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद साधा. वयाच्या ९ व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पाहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या.”
काही दिवसांपूर्वीच अक्षयाच्या सासरी एक दुःखद घटना घडली होती. अक्षयाच्या व हार्दिकच्या वहिनीचे निधन झाले. कर्करोगामुळे हे निधन झाल्याचं समोर आलं. त्यामुळे जोशी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.