सुप्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनला न ओळखणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच असतील. इतकी वर्ष झाली तरीही मायकलची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्याच्या गाण्याबरोबरच स्टाइलसाठीदेखील खूप प्रसिद्ध होता. त्याची गाणी,नृत्य करण्याची शैली यामुळे तो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असे. त्याच्या मुनवॉकचे सगळे जण कॉपी करण्याचाही प्रयत्न करतात. मात्र वयाच्या ५० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. २५ जून २००९ साली त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. (Michael Jackson death reason)
मायकलचा मृत्यू हा रहस्यमयी होता. राहत्या घरी त्याचा मृतदेह सापडला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचेही बोलले गेले. मात्र त्याच्या मृत्यूचे खरं कारण आता समोर आलं आहे. त्याच्या बॉडीगार्ड बिल व्हाईफील्डने हे कारण संगितले आहे. बिलने ‘द सन’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला विचारले की, “कोणाकडून काही चूक झाली आहे का?”, त्यावर त्याने उत्तर दिले की, “हो. हे नक्की कसं झालं यावर मीदेखील खूप विचार केला”.
बिलने मायकलच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितले की, “शेवटच्या दिवसांत ते थोडे अशक्त झाले होते. ‘दिस इज इट’ टुर सुरु होण्याआधी खूप काही बदललं होतं. त्यांच्या आयुष्यात खूप लोक होते आणि ते नेहमी व्यस्त असायचे. सतत सरावदेखील करत असत. हे त्यांना खूप भारी पडेल असेही मी बोलायचो. कोणाच्या हातून मारले गेले हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांना नक्की कोणी मारले? हे मला नेहमी विचारले जाते. मी लोकांना खूप काही सांगितले आहे. खूप लोक त्यांच्या जवळ असायचे मात्र असे अनेक जण होते ज्यांना मायकल यांच्याकडून काही ना काही हवे होते. ते खूप तणावात होते आणि हे सगळं तब्येतीसाठी खूप घातक होतं”.
बिल हा २००६ पासून मायकल बरोबर होता. मायकलवर लैंगिक शोषणाचेदेखील आरोप करण्यात आले होते. मात्र यावर बिलने सांगितले की, “ते तसे नव्हते. त्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या जवळ राहायला पाहिजे. मी त्यांच्या जवळ होतो त्यामुळे मी सांगू शकतो की ते तसे नव्हते”.