मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचं वर्ष खूप खास आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. गेल्या वर्षी वर्षाअखेरीस ‘वेड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. प्रेक्षक मोठ्या संख्येनं पुन्हा चित्रपटगृहांत जाऊ लागले आहेत. यानंतर यंदाच्या वर्षात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. आणि आता २०२३च्या वर्षाअखेरीस हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Hemant Dhome New Movie)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या सिनेमाने पाचव्या आठवड्यात पदार्पण केले असून चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटामध्ये मैत्री अधिक घनिष्ट कशी होतं जाते हे पाहायला मिळालं. सात मैत्रिणी त्यांच्या सात तऱ्हा, त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा, देहबोली याचं उत्तम वर्णन दिग्दर्शकाने केलेलं पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा’ सिनेमाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून सिनेमाचा दुसरा भाग २४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागावरही भरभरून प्रेम केलं.
‘झिम्मा २’च्या अनेक आठवणी, किस्से, यंदाचं वर्ष यावर एकूणच ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. ‘इट्स मज्जा’च्या ‘राउंड टेबल’ या सेगमेंटमध्ये ‘झिम्मा २’ चित्रपटाचा दिग्दर्शक व कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री निर्मिती सावंत व क्षिती जोग हे कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमंतने नव्या वर्षात नवीन काय याचा खुलासा केला आहे. हेमंतने या मुलाखतीदरम्यान सांगितलं की, “मी सिद्धार्थ, क्षिती, निर्मिती ताईला घेऊन २०२४ च्या नोव्हेंबरमध्ये सिनेमा करणार आहे”. यावरुन ‘झिम्मा २’च्या यशानंतर आता लगेचच हेमंत नव्या चित्रपटाच्या तयारीला लागणार असल्याचं समोर आलं आहे.
आनंद एल राय व क्षिती जोग निर्मित तसेच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात तगड्या लोकप्रिय कलाकारांची फौज एकत्र आलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. हेमंतच्या आगामी चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत हे कलाकार असणार असल्याचं समोर आलं असून याव्यतिरिक्त आता कोणते कलाकारांना हेमंतच्या नव्या चित्रपटात एंट्री असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.