बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी चित्रपटही धुमाकूळ घालण्यात मागे राहिलेले नाहीत. सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘झिम्मा २’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः गाजतोय. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचं यशस्वी पदार्पण पाहणं रंजक ठरतंय. चित्रपटाने दमदार कमाई केली असून आतापर्यंत या चित्रपटाने आठ कोटींपर्यंत कमाई केली आहे. महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमधून प्रेक्षक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. (Hemant Dhome Answers To Trollers)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी ठरला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार मंडळीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसले. चित्रपटात असणारी भली मोठी फौज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहणं रंजक ठरतंय.
‘झिम्मा २’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कलाकरांचा प्रमोशन तसंच चित्रपटगृहांमध्ये धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच हेमंत ढोमे याने एका चित्रपटगृहाबाहेरील हाऊसफुल्लचा बोर्ड असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटातील कलाकारही असल्याचं पाहायला मिळत आहे. हेमंतने हा फोटो पोस्ट करत, “जगभरात खरंच ‘जगभरात’ सर्वत्र हाऊसफुल्ल” असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

हेमंतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान एका नेटकऱ्याने कमेंट करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला हेमंतने सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. “आमच्या इकडं तर एक काळ कुत्र जात नाहीय, कसं व कुठे चालू आहे हाऊसफुल्ल हे?” अशी कमेंट एका युझरने केली होती. यावर हेमंतने भन्नाट उत्तर देत त्याला सुनावलं आहे. हेमंतने कमेंट करत, “कारण सिनेमा माणसांसाठी बनवला आहे. त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल”, अशी कमेंट करत त्याला सुनावलं आहे.