अभिनेत्री समिधा गुरु व अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अभिजीत गुरु ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघांनीही त्यांच्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. अगदी लहानपणापासून दोघेही एकमेकांना ओळखत होते. समिधा व अभिजीत दोघेही नागपूरचे आहेत. सोशल मीडियावर अनेक रील व्हिडीओ बनवत ही जोडी प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असते. अशातच समिधा व अभिजीतने नुकतीच ‘अगं आणि अहो’ या सुलेखा तळवलकरच्या सेगमेंटसाठी मुलाखत दिली. (Abhijit Guru And Samidha Guru)
या मुलाखतीत समिधा व अभिजीत यांनी अत्यंत मनमोकळेपणाने चाहत्यांशी गप्पा मारल्या. दोघांनी एकमेकांबद्दल बरंच भाष्य केलं. तसेच त्यांच्या प्रेमकहाणीबद्दलही सांगितलं. समिधा अभिजीतबद्दल बोलताना म्हणाली, “अभिजीतच बोलणं मला फार आवडायचं. त्याच्याबरोबर काम करायची माझी खूप इच्छा होती. त्यावेळेला तो स्टेजवर सर्वांना शिकवायचा. त्यांचा सर्वांवर वर्चस्व असायचं. नागपुरात अभिजीत गुरु याच नाव असेल तर बरेचजण एन्ट्री रद्द करायचे. त्यांचा हा वावर अर्थात कोणत्याही मुलीला आवडेल असा होता”.
अभिजीत समिधाबद्दल बोलत असताना म्हणाला, “आमच्यात प्रेम आहे ही गोष्ट अगदी वाऱ्यासारखी पसरली. केवळ आमच्याच क्षेत्रात नव्हेतर इतरही क्षेत्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आम्ही तेव्हा इतके एकत्र असायचो की एका कार्यक्रमात कोणीतरी चुकून हिचं नाव सौ.अभिजीत गुरु असं घेतलं. तेव्हा आमच्या घरातल्यांना खूप मोठा धक्का बसला. समिधाची आई ऐकून चकितच झाली. त्यांना आम्हा दोघांचं नाव घ्यायचं होतं. या कार्यक्रमात बहुतेक नाटकातील मंडळी होती, त्यामुळे दोन मिनिट तरी ती यावर हसत होती. आणि आम्हाला तेव्हा खूप लाजिरवाणं वाटलं.यावर समिधा म्हणाली, “खरं सांगायचं तर हे सर्वांना आवडतंय याची आम्हाला ग्वाही मिळाली”.
घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, “माझ्या आईकडून पूर्णतः होकार होता. समिधा अधूनमधून घरी यायची. हिच्या घरीही मी जायचो. अगदी लहानपणापासून आमचं येणं जाणं होतं. माझ्या वडिलांचे ट्युशन क्लासेस होते, त्या क्लासमध्ये समिधा शिकवायची. त्यामुळे ओळख अधिक होती. समिधापेक्षा तिची ताई माझी मैत्रीण होती. सुरुवातील ती नाटकांत असायची त्यामुळे आमची ओळख घट्ट झाली. त्यामुळे घरी सगळ्यांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि प्रॉब्लेम होता तर तो माझ्या उंचीचा. तिच्याकडे उंची होती आणि माझ्याकडे उंची नव्हती. आमच्याकडे सगळेजण पाच एक, पाच दोन या उंचीचे आहेत”. यावर समिधा म्हणाली, “माझ्याकडे सगळेजण सहा फूट, सहा दोन या उंचीचे आहेत. मी कधीच उंचीचा विचार केला नाही. आपल्यापेक्षा मुलगा उंचीने लहान आहे असा विचारही माझ्या कधीच डोक्यात आला नाही. आमची मनं जुळली होती, त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा आम्ही कधीच विचारही केला नाही. माझ्या घरी दोघांमधील उंचीवरुन थोडा प्रॉब्लेम झाला. पण काय करु शकतो हा प्रश्न मध्ये होताच”.