भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आयपीएल बरोबरच त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक व त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील मतभेदाची बातमी समोर आली आहे. हार्दिक व नताशा एकमेकांपासून वेगळे झाल्याचेही बोलले जात आहे. नताशाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरुन त्याचे नाव काढून टाकले आहे. मात्र, सोशल मीडियावर युजर्स याविषयी कितीही मत व्यक्त करत असले तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत एली अवरामबरोबरच्या जुन्या नात्यामुळे हार्दिक पांड्याच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्रही दिसले. मात्र, दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. हार्दिकबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. (Hardik Pandya Controversial Statement)
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये त्याने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला होता. या शोमध्ये केएल राहुलही त्याच्याबरोबर होता. त्यानंतर महिलांबाबत केलेल्या टिप्पणीमुळे बीसीसीआयने त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून निलंबित करुन देशात परत पाठवले. २०१९ मध्ये, भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या ६व्या सीझनमध्ये दिसले होते. तिथे हार्दिकने महिलांबद्दल अशा अनेक कमेंट्स केल्या, ज्यासाठी त्याला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
हार्दिकने येथे दावा केला होता की, त्याचे अनेक महिलांशी संबंध आहेत. त्याच्या घरच्यांनाही याची माहिती असल्याचंही त्याने सांगितलं. आणि या बाबतीत तो त्याच्या पालकांबरोबर अगदी मोकळा आहे. त्याने व्हर्जिनिटी गमावल्याचेही आपल्या घरात आधीच सांगितले असल्याचाही खुलासा त्याने केला. जेव्हा करण जोहरने प्रश्न विचारला की, तो क्लबमध्ये गेल्यावर कोणत्याही महिलेचे नाव का विचारत नाही?. यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला होता की, “ती कशी चालते ते मला बघायचे आहे. मला त्यांना बघायला आवडते”. तो असेही म्हणाला की, “तो अनेक वेगवेगळ्या मुलींना मॅसेज पाठवतो आणि त्याला यात काहीच चुकीचं वाटत नाही”. हार्दिक इथेच थांबला नाही. मुलींच्या उपलब्धतेबद्दल तो तिच्याशी उघडपणे बोलतो, असेही तो म्हणाला.
मात्र, या विधानानंतर हार्दिकला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला तेव्हा त्याने ट्विट करून स्पष्ट केले की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता. हार्दिकने लिहिले होते की, “‘कॉफी विथ करण’ शोमधील माझ्या बोलण्यानंतर प्रतिक्रिया आल्या आहेत. माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सर्वांची मी माफी मागतो”. हार्दिकने या ट्विटमध्ये शोलाच दोष दिला आहे. याचे श्रेय त्याने शोच्या स्वरूपाला दिले आणि लिहिले की, “शोच्या स्वरुपामुळे तो बोलण्यात गुंतला. कोणाच्याही भावनेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता”.