Reshma Shinde Kelvan : मराठी मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आता लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. थेट केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लग्नबंधनात अडकणार असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लवकरच रेश्मा आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अभिनेत्रीच नुकतंच केळवण थाटामाटात साजरं झालं. या केळवणाचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने रेश्माचं पहिलं केळवण साजरं केलं असून या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील तिच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केळवणाच्या या फोटोत रेश्मानं हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे. अशातच अभिनेत्रीच्या एंट्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रेश्माने काल, २२ नोव्हेंबरला केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “जीवनात ही घडी अशीच राहू दे”, असं कॅप्शन लिहित हे फोटो शेअर केले. रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमसह इतर कलाकारांनी अभिनेत्रीच केळवण दणक्यात साजरं केलं. खास फुलांची सजावट, पंचपक्वान्नचा थाट यावेळी करण्यात आला होता. भजी, आलू वडी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, कारळ्याचे काप, कोशिंबीर, पोळी, भात, तूप, शेवयाची खीर, गुलाब जामुन, रस-मलाई, जिलेबी, आइस्क्रीम असे गोड-धोडचे पदार्थ रेश्माच्या केळवणासाठी खास करण्यात आले होते.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली देणार का अर्जुनवरील प्रेमाची कबुली, गैरसमजामुळे सुरु आहे गोंधळ, नक्की काय घडणार?
यावेळी रेश्माला आहेर म्हणून हिरव्या बांगड्या, साडी, गजरा अशा सौभाग्याच्या वस्तू देण्यात आल्या. एंट्रीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, रेश्माचा ऑनस्क्रीन नवरा म्हणजेच आशुतोष गोखले लिफ्टमधून रेश्माला उचलून आणताना दिसत आहे. हे सगळं पाहून रेश्मा देखील आश्चर्य चकीत होते. त्यानंतर घरामध्ये एन्ट्री करताना रेश्मावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत स्वागत केलं जातं. रेश्माच्या या हटके एन्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.