Reshma Shinde On Husband : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी सून काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. अभिनेत्री रेश्मा शिंदेने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. बरेच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर रेश्माने पवनसह विवाह केला. रेश्माच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. सध्या रेश्मा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. लग्नानंतर आता अभिनेत्री लगेचच कामावर परतली आहे.
चित्रीकरणासाठी परतलेल्या रेश्माने नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना रेश्माने तिच्या नवऱ्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल, त्याच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केले. रेश्मा म्हणाली, “खऱ्या नवऱ्याचा मला खूप पाठिंबा आहे. लग्नानंतर चार पाच दिवसांत मी कामावर परतले आहे. मी वेगळ्या क्षेत्रात काम करतेय हे पाहून त्याला खूप आनंद होतो. माझं होणारं कौतुक पाहूनही तो खूप खुश होतो. खूप जास्त पाठिंबा आहे”.
ती पुढे म्हणाली, “मी अभिनेत्री आहे हे त्याला अजिबात माहित नव्हतं. आणि जेव्हा त्याला ही गोष्ट कळली तेव्हा त्याला धक्का बसला. बॉलिवूड वगैरे क्षेत्रात एखाद्या व्यक्तीचा जसा वावर असतो तो पाहून त्याला सुरुवातीला असं वाटलं की, हिला गर्व असेल का?. पण गर्व माझ्यात नाही हे पाहून त्याला प्रश्न पडला की मग ही कशी अभिनेत्री आहे. मी त्यानंतर त्याला सांगितलं, मराठी सिनेविश्व हे खूप वेगळं आहे. हिंदी मालिकाविश्वात जसं असतं तसं इथे नाही आहे, मराठी सिनेविश्व हे फार कौटुंबिक आहे. मीडिया, तंत्रज्ञ, कलाकार हे सगळेच इथे एका कुटुंबासारखे राहतात”.
नवऱ्याबाबद्दल आणि थोडक्यात लव्हस्टोरी सांगत रेश्मा म्हणाली, “तो आयटी क्षेत्रात कामाला आहे. पेशाने तो इंजिनिअर आहे. आम्ही सुरुवातीला मित्र होतो. ते खूप वर्ष युकेला होते. लग्नानंतर मी लगेचच कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे हवा तितका असा वेळ नवऱ्याला देत येत नाही आहे. पण मी सर्व बाजू सांभाळत माझ्यापरिने सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे”.