‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका येत असलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या घरोघरी मातीच्या चुली या नव्या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेत रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेही भूमिका साकारताना दिसत आहे. नयना आपटे मालिकेत आजीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मालिकेतील नयना आपटे यांच्या भूमिकेनेही साऱ्यांचं मन जिंकलं आहे. (Nayana Apte)
मनोरंजन विश्वातील या जेष्ठ दिग्गज अभिनेत्रीने केवळ चित्रपटच नाही तर, नाटक आणि मालिकाविश्व देखील गाजवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनयाचं बाळकडू त्यांना आई अभिनेत्री शांता आपटे यांच्याकडूनच मिळालं होतं. सध्या नयना आपटे छोट्या पडद्यावर सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी ‘इट्स मज्जा’ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी कुंकू न लावणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
नयना आपटे म्हणाल्या, “कपाळाला हल्ली कुंकू लावत नाहीत. कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून तयार केली जायची. आता टिकली आहे. आता सौभाग्यवती बाथरूम असते, बाई असते की नाही माहीत नाही. कुंकू लावणे हा एक योगाचा प्रकार आहे. कुंकू नेहमी तर्जनीने लावले जाते. आणि कपाळावर ज्या भागात कुंकू लावतात तिथे कुंडली जागृत असते. आपल्या मेंदूच्या मध्यभागेची नस तिथे जोडली आहे. रोजच्या रोज त्या भागावर मसाज केला गेला तर वायब्रेशन होऊन तुमचा मेंदु अलर्ट होतो. हे कुंकू लावण्यामागचं शास्त्र आहे. हे शास्त्र फार कुणी समजून सांगत नाही”.
नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत व गुजराती नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’, ‘एक चुटकी आसमान’, ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत. तसेच त्यांच्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मराठी मालिकाही गाजल्या.