मराठी मनोरंजन सृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी. आजवर गश्मीरने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. शिवाय तो सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून चाहत्यांबरोबर नेहमीच संपर्कात असतो. प्रश्न उत्तरांचे विविध सेशन घेत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. दरम्यान चाहत्यांना प्रश्न विचारायची संधी तर तो देतोच शिवाय तो चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तर ही देतो. (Gashmeer Mahajani Post)
श्मीर महाजनी याचे वडील म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर रवींद्र महाजनी यांच्या चाहत्यांनी अनेक प्रश्नोत्तरे करत त्याला ट्रोल केलं. अभिनेते रवींद्र महाजनी हे घरापासून दूर एकटेच राहत होते, शिवाय त्यांच्या मृत्यूची बातमी ही दोन दिवसानंतर कळाली, त्यामुळे वडिलांच्या निधनाला अनेकांनी गश्मीरला जबाबदार ठरवले. तेव्हापासून गश्मीर विशेष चर्चेत आहे.
आता गश्मीरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने त्याला पडत असलेल्या स्वप्नाबद्दल लिहिलं आहे. गश्मीरने स्टोरी पोस्ट करत लिहिलं आहे की, “एक स्वप्न आहे. ते रोज येतं. कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं. मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही. मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला. माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो. तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं. म्हातारं झालं आणि लाचार झालं”. गश्मीरने लिहिलेली ही पोस्ट चाहत्यांना पाहणं रंजक ठरली.

वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने कामातून ब्रेक घेतला होता, मात्र आता त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्याच्या नव्या कामाची माहिती दिली. “पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …” असं कॅप्शन देत गश्मीरने एक व्हिडीओ शेअर केला होता. यावरून तो लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं समजतंय.