‘गदर २’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी जागतिक अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीच्याबाबत दिलेली एक प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे. अनिल शर्मा व प्रियांका चोप्रा यांनी ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’मध्ये एकत्र काम केले होते. ‘गदर २’ चित्रपटाच्या यशानंतर प्रियांकाने दिग्दर्शकाला पत्र लिहून अनेक शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता अनिल शर्मा यांनी प्रियांका चोप्राच्या नाकाच्या शस्त्रक्रियेवर आणि तिच्या कामावर प्रतिक्रिया दिली आहे. प्लॅस्टिक सर्जरीमुळे प्रियांकाचा चेहरा कसा बिघडला आणि याच कारणामुळे बड्या दिग्दर्शकांनी तिला अनेक चित्रपटांमधून वगळले याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. (Anil Sharma On Priyanka Chopra)
अनिल शर्मा यांनी अलीकडेच ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबाबत प्रतिक्रिया दिली. २००३ मध्ये दिग्दर्शकाने प्रियंका चोप्राला आपल्या ‘हीरो’ चित्रपटात साईन केले होते. पण याच दरम्यान प्रियांका चोप्राच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्लास्टिक सर्जरीमुळे तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
याबाबत बोलताना अनिल शर्मा म्हणाले, “प्रियांका चोप्रा खूप चांगली आहे. मी तिला माझ्या चित्रपटासाठी साईन ही करून घेतलं होतं. इतकेच नव्हे तर माझ्या पत्नीनेही तिला धनादेश सुपूर्द केला होता. ‘गदर’ रिलीज झाल्यानंतर मी अमेरिका व युरोपला गेलो. जेव्हा दोन महिन्यांनी परत आलो तेव्हा प्रियांका चोप्राच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली होती. तिला ज्युलिया रॉबर्ट्ससारखे दिसायचे होते असं काहीस सर्व वर्तमानपत्रात मी वाचले होते. त्यामुळे मलाही असं वाटलं की, इतकी सुंदर असूनही प्रियांका असं का करतेय.”
अनिल शर्मा पुढे म्हणाले, “प्लॅस्टिक सर्जरीनंतर ती खूप भयानक दिसत होती. तिचा चेहरा काळवंडला होता. मी विचार करू लागलो की प्रियांकाने हे नक्की काय केले आहे? मी हे सर्व फोटोंमध्ये पाहिले आणि लगेच प्रियांकाला भेटायला बोलावले. दुसऱ्याच दिवशी ती माझ्या ऑफिसमध्ये आली. प्रियांका आणि तिची आई मधु चोप्रा दोघीही रडत होत्या. अभिनेत्रीच्या नाकावरही खुणा होत्या आणि आजही आहेत. प्रियांकाचा चेहरा बरा होण्यासाठी अनेक महिने लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. यामुळे प्रियांकाला अनेक चित्रपटांसाठी नाकारण्यात आलं.”
यापुढे अनिल शर्मा यांनी असेही सांगितले की, “साइनिंग अमाऊंट परत केल्यानंतर प्रियंका चोप्राने बरेलीला परतण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी अनिल शर्मा यांनी स्वतः प्रियांकाला समजावले आणि सांगितले की ते मेक-अप आर्टिस्टला बोलावतील आणि तिच्या चेहऱ्यावरील खुणा सर्व काही झाकून टाकतील. जेणेकरून ते पडद्यावर पाहताना छान दिसेल.”